पुर्नविकासाच्या नावाखाली फसवणूक

पुर्नविकासाच्या नावाखाली फसवणूक

पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक
पीडित १६ गृहसंकुलातील रहिवाशांची कैफियत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : नौपाडा, पाचपाखाडी, चरईतील १६ गृहसंकुलातील रहिवासी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.२) झालेल्या बैठकीत सुमारे २०० हून अधिक पीडितांनी आपली कैफियत मांडत फसवणूक करणाऱ्या विकासकाचे जिथे कुठे प्रकल्प सुरू असतील ते बंद करण्याची मागणी केली.
जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या नौपाडा, चरई भागातील शेकडो इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या भागातील अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू आहे. कौस्तुभ कळके आणि त्यांच्या भागीदाराने मे. जोशी एंटरप्रायजेस नावाने बांधकाम कंपनी सुरू करून काही वर्षांपूर्वी अशा पद्धतीने इमारत पुनर्विकासाची कामे हाती घेतली, मात्र भागीदारांमध्ये वाद झाल्यानंतर हे प्रकल्प रखडण्यास सुरुवात झाली. बाधित कुटुंबांना ठरवून देण्यात आलेले भाडेही मिळेनासे झाले. त्यातच ज्या सदनिका बांधून तयार होत्या, त्याची परस्पर विक्रीही करण्यात आली. याविरोधात रहिवाशांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले. त्याचा तपास अजूनही सुरू आहे. या सर्व प्रकरणामुळे तीन वर्षांपासून प्रकल्प रखडले असून आपले हक्काचे पक्के घर कधी मिळणार, असा प्रश्‍न या रहिवाशांना सतावत आहे. राहते घर सोडून हजारो रहिवासी सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत, मात्र आणखी किती दिवस असेच भाड्याने रहायचे, ही चिंता त्यांना सतावत असल्याने त्यांची रविवारी ठाण्याच्या सहयोग मंदिरच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी आमदार संजय केळकर उपस्थित होते.

..

कायदेतज्ज्ञांकडून मार्गदर्शन
सहयोग मंदिर येथे झालेल्या बैठकीत सुमारे १६ गृहसंकुलातील २०० सभासद उपस्थित होते. त्यांना कायदेतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, कौस्तुभ कळके यांची ज्या ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत, तिथे टाच आणण्याची गरज असल्याचे मत यावेळी आमदार केळकर यांनी व्यक्त केले, तसेच त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com