पावसाच्या तोंडावर रस्त्यांची दुरवस्था कायम

पावसाच्या तोंडावर रस्त्यांची दुरवस्था कायम

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात खोदण्यात आलेले रस्ते ३१ मेपर्यंत वापरायोग्य करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्त संजय काटकर यांनी दिले होते, मात्र ही मुदत उलटून तीन दिवस झाले तरीदेखील रस्त्यांची स्थिती आहे तशीच आहे. त्यामुळे आयुक्तांचे आदेश केवळ कागदावरच राहिले असल्याचे दिसून येत आहे.

शहरात सर्वत्र सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. जागोजागी रस्ते खोदून ठेवले असल्याने वाहतूक कोंडी होतच आहे, शिवाय रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांनाही मनस्ताप होत आहे. दुसरीकडे खोदून ठेवलेल्या रस्त्यांतून उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. शहराच्या झालेल्या या दुरवस्थेवर ‘सकाळ’ने या आधीच प्रकाशझोत टाकला होता. रस्त्यांच्या संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे आगामी पावसाळ्यात शहराची अवस्था दयनीय होणार असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांनीदेखील रस्त्याची कामे संथगतीने सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयुक्तांनी रस्त्यांची नव्याने खोदाई बंद करण्याचे आदेश देऊन खोदलेले रस्ते ३१ मेपर्यंत नागरिकांच्या वापरायोग्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र या आदेशानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अद्याप खोदलेल्या स्थितीतच आहेत. काही ठिकाणी तर नव्याने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडतच आहे.

१० जूनपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस कधीही येण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. ३) सकाळी पावसाची हलकी सरदेखील येऊन गेली. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते लवकरात लवकर पूर्ववत झाले नाही, तर परिस्थिती बिकट होणार आहे.

नाल्यांत गाळ जाण्याची भीती
काही ठिकाणी अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण व अर्धा रस्ता खोदलेला अशी अवस्था आहे. अशा रस्त्यांना योग्य पद्धतीने संरक्षक कठडेदेखील लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जातात. अशावेळी खोदलेल्या रस्त्यांचा वाहनचालकांना किंवा पादचाऱ्यांना अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे खोदलेल्या रस्त्यांची माती पावसाच्या पाण्याबरोबर लगतच्या नाल्यात वाहून जाण्याची व नाले पुन्हा गाळाने भरण्याचीही शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com