कासा बाजारपेठ अडकली कोंडीत

कासा बाजारपेठ अडकली कोंडीत

कासा, ता. ६ (बातमीदार) : मनोर-वाडा रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती आणि ठाणे-घोडबंदर येथील रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद असल्याने अनेक वाहने सध्या भिवंडी-वाडा-विक्रमगड, तलवाडा, कासा-चारोटी मार्गे वळवण्यात आली आहे. त्यात कासा बाजारपेठेमध्ये रस्ता अरुंद आहे. त्यामुळे डहाणू-नाशिक राज्य मार्गावर कासा बाजारपेठ ते चारोटी नाका या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कासामधील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
कासा बाजारपेठेत अनेक ठिकाणी विक्रेते रस्त्याकिनारी बसलेले असतात. त्याचबरोबर रिक्षा थांबे, बस थांब्यांमुळे प्रवाशांची गर्दी असते. दुकानदार, व्यापाऱ्यांच्या मालवाहू ट्रक रस्त्याजवळच उभ्या असतात. कासा उपजिल्हा रुग्णालय, कासा पोलिस ठाणे, कृषी दुकाने, तलाठी कार्यालय हे रस्त्यालगतच असल्याने परिसर नेहमी गजबजलेला असतो. काही दिवसांत शाळा, महाविद्यालय सुरू होणार आहे. यात भिसे विद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थी याच रस्त्याचा वापर करतात. कासा मुख्य बाजारपेठ ही कासा-चारोटी नाका या रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वनविभागाने रस्त्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष द्यावे; तसेच बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायतींनीही या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

कासा-चारोटी मार्गावर वनविभागाने आपल्या जागेतील अतिक्रमणाकडे लक्ष द्यावे. बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करावीत. कारण काही दिवसांत शाळा, महाविद्यालये सुरू होतील. शेतकरी शेतीविषयक सामान खरेदी करण्यासाठी बाहेर पडतील. त्यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात वाहतूक कोंडी होऊन अपघात घडू शकतात.
- विपुल राऊत, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, डहाणू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com