भांडुप डोंगरालगतच्या संरक्षण भिंती जीर्ण

भांडुप डोंगरालगतच्या संरक्षण भिंती जीर्ण

भांडुप डोंगरालगतच्या संरक्षण भिंती जीर्ण
दरड कोसळण्याची रहिवाशांना भीती
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः भांडुप येथील डोंगराळ भागातील खिंडी पाडा, श्रीराम पाडा, दर्गा मार्ग निराकार चाळ, बंगाली चाळ, विश्वशांती सोसायटी व अन्य भागात बांधलेल्या संरक्षण भिंती जीर्ण झाल्या आहेत; तर नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंती आरसीसीच्या नसल्‍याने या भागातील रहिवाशांच्या मनात दरड कोसळण्याची भीती आजही कायम आहे.
भांडुप परिसरातील रमाबाई नगर, नरदास नगर, गावदेवी टेकडी, टैबी पाडा, खिंडी पाडामधील रावते कंपाऊंड, गायत्री शाळा, आंब्याची भरणी, श्रीराम पाडा, हनुमान टेकडी, नवजीवन, अशोक टेकडी, सोलापूर दर्गा, विश्वशांती सोसायटी परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे दरड कोसळण्याची व नाल्यांना पूर येऊन एखादी दुर्घटना घडू शकते. त्‍यामुळे हा परिसर धोक्याचा असल्याचा इशारा पालिका एस विभागाने दिला आहे.या परिसरात काही ठिकाणी संरक्षण भिंत दगडाने बांधलेली आहे; तर बहुतेक ठिकाणी संरक्षण भिंती जीर्ण झालेल्या आहेत.
पावसाळा जवळ आला की पालिका एस विभाग व जिल्हाधिकारी नोटीस देतात. मात्र, पुनर्वसन करीत नाहीत. अशी तक्रार नागरिकांची आहे.
या परिसरातील डोंगरमाथ्यावर म्हाडातर्फे सध्या नवीन संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे; तर काही ठिकाणी निधी अपुरा पडल्याने भिंतींचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. या पूर्वी २००३, २०१२ मध्ये बांधण्यात आलेल्‍या संरक्षण भिंतीची अवस्था खूपच धोकादायक झाली आहे. त्यामुळे दगडाच्या भिंतींऐवजी आरसीसी भिंत बांधण्यात यावी, तसेच निधीअभावी रखडलेल्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात शकुंतला परब यांच्या घरावर दरड कोसळली होती; या दुर्घटनेत कुटुंबातील सर्व सदस्य थोडक्यात बचावले. मात्र घर जमीनदोस्त झाले होते. मात्र अजूनपर्यंत कुठलीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे परब यांनी सांगितले. उलट आलेली मदत मध्यस्थांनी हडप केल्याचा आरोप परब यांनी केला आहे.
आमदार व म्हाडाने आपल्या निधीतून नवीन भिंत बांधली आहे. मात्र निराकारजवळील शेजारी असलेली जीर्ण भिंत अद्याप बांधलेली नाही. डोंगरावरील गटारातील वाहणारे पाणी, घुशी, झुडपे जीर्ण संरक्षक भिंतीवर उगवले असल्यामुळे त्या भिंती भुसभुशीत झाल्या आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्घटना घडून एखाद्याचा बळीही जाऊ शकतो. मुसळधार पाऊस पडल्‍यास खूप भीती वाटते, असे इथले रहिवासी शेख यांनी ‘सकाळ’कडे बोलताना सांगितले.

म्हाडाने संरक्षण भिंत बांधली आहे. मात्र जीर्ण झालेल्या भिंतीकडे कुणाचे लक्ष नाही. या हलगर्जीपणाचा फटका पावसाळ्यात बसू शकतो. त्यामुळे आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची गरज आहे.
- जगन्नाथ चव्हाण, स्थानिक रहिवासी

म्हाडाकडून दगडाची व आरसीसी भिंत बाधण्यात आलेली आहे. काही ठिकाणी निधीअभावी व आचारसंहितेमुळे संरक्षण भिंतीचे काम रखडलेले आहे. आचारसंहिता संपल्यावर हे काम पुढे नेण्यासाठी, जीर्ण संरक्षण भिंती पाडून त्याजागी आरसीसी भिंत बांधण्यासाठी पत्रव्यहार केला आहे.
- पवन कुमार बोराडे, सामाजिक कार्यकर्ते

विक्रोळी आणि भांडुप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना, जीवित अथवा वित्तहानी झाल्यास मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही.
- सहायक आयुक्त,
एस विभाग, पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com