बोरीवली स्थानकात केबलची चोरी

बोरीवली स्थानकात केबलची चोरी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेपाठोपाठ सोमवारी पश्चिम रेल्वेच्या लोकल वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. बोरिवली रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेची केबल चोरीला गेल्याने स्थानकातील संपूर्ण सिग्नल यंत्रणा ठप्प होती. त्यामुळे संध्याकाळी पाचपर्यंत ६० लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर ओढावली.
बोरिवली स्थानकातील सिग्नल यंत्रणेतील केबल सोमवारी पहाटे तुटल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे फलाट क्रमांक एक आणि दोनवरील लोकलची वाहतूक ठप्प झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी फलाट क्रमांक ३, ४, ५, ६, ७ आणि ८ वरून लोकलची वाहतूक सुरू ठेवण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी पथकाने सिग्नल यंत्रणेत पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले. दुपारी १२च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत दुरुस्ती केली. त्यानंतर फलाट क्रमांक एकवरून वाहतूक सुरू करण्यात आली; पण चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.
----------------------------------------------
संध्याकाळी पाच वाजता सेवा पूर्ववत
सिग्नल बिघाडानंतर पश्चिम रेल्वेने डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, अप-डाउन धिमी आणि जलद चारही मार्गांवरील लोकलची वाहतूक विस्कळित झाली होती. अनेक लोकल एका मागे एक उभ्या असल्याने लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दिवसभर हा गोंधळ सुरू असल्याने संध्याकाळपर्यंत पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या ६० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर १०० पेक्षा जास्त लोकल उशिराने धावत होत्या. संध्याकाळी पाचनंतर सर्व मार्गांवरील लोकल वाहतूक पूर्वपदावर आली.
-----------------------------------------------
रेल्वेची चौकशी सुरू
बोरिवली स्थानकातील सिग्नल यंत्रणेतील केबल सोमवारी पहाटे तुटल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मात्र, सिग्नल यंत्रणेतील केबल तुटली की चोरीला गेली आहे, याची रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणेतील केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. तसेच मॉन्सूनपूर्व कामे पश्चिम रेल्वेकडून केली जात आहेत. त्यामुळे रात्री काम करत असल्याने तर तुटली नाही, यासंदर्भातही रेल्वेकडून चौकशी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com