भिवंडीत श्री गंगा दशहरा उत्सवाचा शतकोत्तर

भिवंडीत श्री गंगा दशहरा उत्सवाचा शतकोत्तर

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : भिवंडीतील पुरातन असलेल्या श्री भीमेश्वर संस्थानच्या भीमेश्वर मंदिरात श्री गंगा दशहरा उत्सवाचे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने २ ते १५ जूनपर्यंत विविध कार्यक्रमांसह कीर्तनकारांची मांदियाळी आयोजित केल्याने भाविकांनी या उत्सवात हिरीरीने सहभाग घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भिवंडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भीमेश्वर मंदिरात हा उत्सव १८५० पासून सुरू झाला. १८४८ ते १८५० या दरम्यान पेशव्यांच्या काळात भिवंडी गावात मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी तत्कालीन ब्राह्मणआळीतील कांड, घुले व मेकल या प्रतिष्ठित घराण्याच्या नेतृत्वाने कामतघर येथील वऱ्हाळा तलावाचे पाणी भिमेश्वर मंदिराजवळ हौद बनवून त्यामध्ये आणण्यात आले. यासाठी त्या काळातील खापरी गोल कौलांचा उपयोग करून त्याची वाहिनी बनवली होती. कामतघर येथील देवीच्या देवळासमोर दगडी टाकी बांधून त्यामध्ये मोटेच्या साह्याने तलावाचे पाणी टाकले जात होते. त्या टाकीला खापराच्या कौलांची पाईपलाईन जोडली आणि तलावाचे पाणी भिवंडी गावातील भीमेश्वर देवळा शेजारील हौदात आणले. हे पाणी गोमुखातून हौदात जमा होत असल्याने गावातील सर्व गावकरी पाणी भरत होते. या हौदाला जोडून गावात इतर ठिकाणी हौद बांधण्यात आले. अशा प्रकारे गंगा गावात अवतरली, असे मानत १८५०पासून भीमेश्वर मंदिरात दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी या कालावधीत गंगा दशहरा उत्सव सुरू झाला. हा उत्सव परंपरागत अव्याहतपणे गेली १७४ वर्षे सुरू आहे. यावर्षी श्री भीमेश्वर संस्थान या उत्सवाचे १७५वे वर्ष साजरे करत आहे.
त्या निमित्ताने २ जूनला वऱ्हाळा तलावावर गंगापूजन करून गंगा कलशाची ब्राह्मणआळीतील गणपती मंदिर ते भीमेश्वर मंदिरापर्यंत स्वागत यात्रा काढण्यात आली. तसेच विविध कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. १६ जूनपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहे. श्रीचा पालखी सोहळा गंगापूजन झाल्यानंतर ललिताच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com