पालघरला नवीन शिलेदार

पालघरला नवीन शिलेदार

वसई, ता. ४ (बातमीदार) : देशभरात लोकसभा निवडणुकीची मंगळवारी (ता. ४) सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावर अनेकांना राजकीय धक्का बसला. या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांनाही धक्का बसला. पालघर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सूर्या कॉलनीमधील गोडाऊनमध्ये करण्यात आली. या मतमोजणी केंद्रावर कायकर्ते, नेते आणि प्रसारमाध्यमांची गर्दी होती. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत गेली. महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत त्यांच्या विजयाची नांदी वाजत राहिल्याने दुपारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अखेर ते विजयी होताच त्यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत एकच जल्लोष केला.

पालघर मतदारसंघामध्ये तीन उमेदवारांमध्ये चुरस होणार, असे तर्क लावले जात होते; मात्र महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा हे आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत डॉ. हेमंत सवरा आणि महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांच्यात चुरस झाल्याचे दिसून आले. त्यानंतर झालेल्या फेरीपासून सवरा हे आघाडीवर राहिले. महायुती पहिल्या क्रमांकावर चालत राहिली, तर महाविकास आघाडीच्या भारती कामडी दुसऱ्या, तर बविआचे राजेश पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. एकीकडे तीन उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे बोलले जात असताना सवरा यांनी बाजी मारली. पालघरमध्ये अनेक राजकीय दावे केले जात होते. कोण बाजी मारणार, याचा आढावादेखील घेण्यात आला; परंतु मतदारराजाने महायुतीला कौल दिला. आता पालघरचा शिलेदार झालेले डॉ. हेमंत सवरा हे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कोणती पावले उचलणार, याकडे मतदारांचे लक्ष लागणार आहे.

मनसेचादेखील आधार
महायुतीचे डॉ. हेमंत सवरा यांनी मतदारसंघात अनेक दौरे केले. त्याचबरोबर त्यांनी प्रचारात मुसंडी घेतली होती. त्यातच मनसेनेदेखील महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदादेखील पालघर लोकसभेत उमेदवाराला झाला आहे.

पहिल्यापासून आघाडी
महायुतीने पालघर लोकसभेत जोरदार प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा फायदेशीर ठरल्या, तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे ते या निवडणुकीचे किंगमेकर ठरले. याचा परिणाम म्हणजे डॉ. हेमंत सवरा यांच्यासमोर अन्य उमेदवाराला सुरवातीपासून आघाडी घेता आली नाही.

कार्यालयांमध्ये गर्दी
अनेक ठिकाणी भाजपची कार्यालये सकाळीच उघडण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू गर्दी झाली. सावरा हे विजयी होत आहेत, हे दिसताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. तसेच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.

पोलिसांचा बंदोबस्त
पालघर लोकसभेची मतमोजणी सुरू झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध पक्षीय कार्यालयांजवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. संध्याकाळपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

उमेदवार मते
डॉ. हेमंत सावरा ६,०१,२४४
भारती कामडी ४,१७,९३८
राजेश पाटील २,५४,५१७
नोटा २३,३८५
भारत वनगा १५,४६२
मीना भड १४,२३५
दिनकर वाढान १०,७८७
मोहन बारकू १०,७६१
विजया म्हात्रे १०,९३६
अमर कवळे ९,८२१
राहुल मेढा ७,०८५

रद्द मते ६०३
एकूण मते १३,७६,६७७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com