वीजरोधक मनोऱ्याच्या अभावामुळे धोका

वीजरोधक मनोऱ्याच्या अभावामुळे धोका

खर्डी, ता. ४ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम पठारी भागातील खेड्या-पाड्यांत दरवर्षी वीज कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तीय व जीवितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. परिसरातील आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि हस्त नक्षत्रातील पावसात वारंवार वीजप्रपाताला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा मागणी करूनही या भागात वीजरोधक मनोरे बसवण्याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याने आदिवासी बांधव तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

खर्डी परिसरातील दहिगाव, भोसपाडा, शिरोळ, बिरवाडी, अजनुप, धामणी, अघई, वेळुक वाशाळा; तसेच टाकी पठार परिसरातील सावरोली, सोगाव, कानडी, आपटे, खराडे, ढाढरे, डेहणे, नडगाव, खरिवली या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे २५ ते ३० गावपाड्यांना दरवर्षी चक्रीवादळ, वीज कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. सावरोली, खरपत, नामपाडा, बेलकडी, गांगणवाडी, हिरव्याची वाडी, झापवाडी, टाकीची वाडी, उंबरवाडी, रिकामवाडी, फणसवाडी, आंबेखोर, कवट्याची वाडी येथेही दरवर्षी वीज पडून अनेकांचे जीव गेले आहेत. तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या ठिकाणी मागील चार वर्षांत वीज पडून २० ते ३० नागरिक आणि ५० पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ही गंभीर समस्या असूनही याकडे दुर्लक्ष केले आहे. या परिसरात प्रशासन कधीही पोहोचलेली नाही.
अवकाळी पावसात वीज पडून जीवितहानी होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या परिसरात वारंवार होणाऱ्या वीजप्रपाताला आळा घालण्यासाठी सर्व शासकीय विभागाकडे वीजरोधक मनोरे बसवण्याची मागणी आदिवासी जनता करत आहेत. तरीही सरकार लक्ष देत नसल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर सरकारला जाग येईल? असा सवाल तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत. उंच ठिकाणी उभारलेल्या वीजरोधक मनोऱ्यामुळे पाच ते सात किमी परिसरातील वीज मनोऱ्याकडे खेचल्या जात असल्याने जीवितहानी टाळता येत असल्याचे येथील महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत झालेल्या घटना
२०१६ मध्ये खर्डीतील गवळीनगर येथे सार्वजनिक गाणेशोत्सव काळात वीज पडून १५ जण गंभीर जखमी झाले होते. वीज पडून खरपत येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर सावरोलीत दौलत गणपत दवणे यांच्या तीन म्हशी जागीच दगावल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी भोसपाडा येथील आदिवासी वस्तीवर वीज पडून दोन ठार, एक गंभीर जखमी झाल्याने येथील परिसरातील रहिवाशांनी विजेचा धसका घेतला आहे.

-----------------------------------------
शहापूर तालुक्यात वीज पडून दरवर्षी अनेकांचे बळी जात आहेत. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी वीज पडत असलेल्या परिसरात वीजरोधक मनोरे बसविण्यात यावेत.
- गणेश राऊत, तालुका संपर्कप्रमुख, ठाकरे गट, शहापूर


अशी आहे यंत्रणा
- मोकळ्या जागेत टॉवरप्रमाणे लोखंडी खांब उभारला जातो. त्याची अर्थिंग जमिनीत सोडली जाते.
- एका टॉवरची उंची अंदाजे ५० फूट असते. त्याच्या परिघातील पाच पट म्हणजे २५० फुटांपर्यंत कोसळणाऱ्या विजेचा अटकाव होतो.
- या टॉवरच्या जवळपास वीज कोसळल्यास वीज खेचून जमिनीत घालण्याची क्षमता यामध्ये असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com