मुंबईत काँग्रेसने राखले अस्तित्व

मुंबईत काँग्रेसने राखले अस्तित्व

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः राज्यात राखेतून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणाऱ्या काँग्रेस पक्षाने मुंबईत एक जागा जिंकत स्वतःचे अस्तिव कायम ठेवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत एकही जागा जिंकता आली नव्हती. या वेळी काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा आल्या. पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या वर्षा गायकवाड यांनी जोरदार कमबॅक करत ही जागा जिंकली; पण उत्तर मुंबईची जागा मात्र साडेतीन लाखाच्या फरकाने काँग्रेसने गमावली.
मुंबईत काँग्रेसने महाविकास आघाडीतून मुंबईतील सहा जांगापैकी केवळ दोन जागा लढवल्या. काँग्रेसला मिळालेला उत्तर मुंबई मतदासंघ लढवण्यासाठी काँग्रेसचे नेते इच्छुक नव्हते. पक्षाकडे योग्य उमेदवार नसल्यामुळे या जागेवर दिवंगत शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असाही प्रयत्न झाला. मात्र, घोसाळकर कुटुंबीयांकडून त्यासाठी नकार मिळाला. शेवटी नवा चेहरा असलेल्या भूषण पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या उत्तर मुंबईतून २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी साडेचार लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. पियूष गोयल यांना उमेदवारी दिल्यामुळे सर्व भाजपची यंत्रणा कामी लागली. शिवसेनेच्या मदतीने भाजपच्या अजस्र निवडणूक यंत्रणेशी टक्कर देण्याचा प्रयत्न भूषण पाटील यांनी केला. मात्र, मतमोजणी सुरू झाल्यापासून प्रत्येक फेरीत भूषण पाटील हे पिछाडीवर होते. तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने गोयल यांनी ही जागा जिंकली.
-------------------------------------------
काँग्रेससाठी संजीवनी
दुसरीकडे उत्तर मध्य मुंबईत जातीय समीकरण काँग्रेसच्या बाजूने होते. या वेळी भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून नवखे उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले. वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी आग्रही होत्या. मात्र, मतदारसंघ न मिळाल्यामुळे शेवटी गायकवाड यांना शेवटच्या क्षणी उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून उतरवण्यात आले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून उज्ज्वल निकम यांनी आघाडी घेतली. अगदी शेवटच्या चार फेऱ्यांत हे चित्र बदलले. तब्बल ६४ हजारांची आघाडी मोडून वर्षा गायकवाड यांनी अशक्यप्राय समजला जाणारा विजय खेचून आणला. हा विजय मुंबई काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
-------------------
शिवसेनेची साथ
निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेने एकमेकांना मदत केली. वर्षा गायकवाड आणि अनिल देसाई यांच्या विजयातून हे दिसून आले. वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) च्या अनिल देसाई यांनी मताधिक्य घेतले. त्याचप्रमाणे मुंबादेवीत सावंत यांनी लिड घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com