मुस्लिम मतांमुळे अरविंद सावंतांचा विजय

मुस्लिम मतांमुळे अरविंद सावंतांचा विजय

मुंबादेवी, ता. ४ (बातमीदार) : दक्षिण मुंबईतील अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अरविंद सावंत यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केला. अरविंद सावंत यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका मुस्लिम आणि दलित मतदारांनी बजावली. उबाठा शिवसेनेच्या मशालची धग वाढवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस, रिपब्लिकन आंबेडकरी मित्रपक्ष आणि मुस्लिम समाजाच्या एकगठ्ठा मतांनी इंधनाची भूमिका बजावली.

कुलाबा, मलबार हिल आणि भायखळा या मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि मनसेची ताकद होती; तर मुंबादेवी, वरळी आणि शिवडी या मतदारसंघात काँग्रेस आणि मित्रपक्षांसोबत आंबेडकरी पक्षांची ताकद आहे. शिवसेना फुटीचा राग मतदारांच्या मनात होता, ती खदखद मतांच्या रूपात अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडली. तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यासोबत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आरपीआय (आठवले) आणि मनसेची पूर्ण ताकद होती, असे असतानाही महाविकास आघाडीच्या सावंत यांनी विजय मिळवला.

कुलाबा विधानसभेचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मलबार हिलचे आमदार आणि उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भायखळ्याच्या आमदार उमेदवार यामिनी जाधव यांनी पूर्ण ताकद जिंकून येण्यासाठी लावली; मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत. कुलाबा आणि मलबार हिल हे भाजपचे गड म्हणून ओळखले जातात. येथील गुजराती, मारवाडी व्यावसायिक, बंगाली भाषिक कामगार यांच्या एकगठ्ठा मतांची ताकद सोबत असतानाही यामिनी जाधव यांना पराभूत व्हावे लागले.

काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांच्या मतदारसंघातील ७० टक्के असलेल्या मुस्लिम मतदारांनी ९० टक्के मतदान महाविकास आघाडीला केल्याने अरविंद सावंत यांचा विजय सुकर झाला. जुनी पेंशन योजना लागू न करणे, सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण आणि राज्य घटना बदलणार हे मोठे मुद्दे या निवडणुकीत भाजपविरोधात गेल्याची भावना खोरीपचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील निरभवणे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com