वार्तापत्र- ईशान्य मुंबई

वार्तापत्र- ईशान्य मुंबई

ईशान्य मुंबईत संजय पाटील यांना घवघवीत यश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेना (ठाकरे) गटाने विजय मिळवला. गेल्या दोन टर्मपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. तीन दशकांपासून भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ कायम भाजपच्या वाट्याला येत होता. संजय दिना पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आपली विजयाची घोडदौड सुरूच ठेवली होती. या विजयात महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो मराठी आणि मुस्लिम मतांचा. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट), काँग्रेस पक्ष आणि आघाडीतील इतर घटक पक्षांची झालेल्या एकजुटीमुळे इंडिया आघाडीला एकगठ्ठा मतदान झाल्यामुळे आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा विजय अधिक सोपा झाला.
भाजपच्या विरोधात, नकारात्मक भूमिकेतून नागरिकांनी मतदान केले होते. मतमोजणीतून हे दिसून आले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदरेज कॉलनीतील उदयांचल प्राथमिक शाळेतील मतमोजणी केंद्रात सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली. सुरुवातीला पोस्टल मते मोजण्यात आली आणि त्यानंतर पहिल्या फेरीची मते मोजण्यास सुरुवात झाली. संजय पाटील यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली होती, त्यांची ही आघाडी पुढच्या प्रत्येक फेरीत कायम राहिली. विक्रोळी, मुलुंड, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मराठी मतदारांची एकगठ्ठा मते संजय पाटील यांच्या पारड्यात पडल्याचे या निकालावरून दिसून आले. मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांनी त्यांना साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. त्यामुळे पाटील यांना घवघवीत यश मिळाले.
मुलुंड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातील भाजपचे परंपरागत मतदार तसेच गुजराती भाषक मतदार यांनी भाजपचे मिहीर कोटेचा यांनाही भरघोस मतदान केले. मात्र, ठाकरे गटाचे संजय पाटील यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. ठाकरे गटाचे उमेदवार पाटील आणि भाजपचे कोटेचा यांनी आपला प्रचार जोरदार केला होता. पंतप्रधान मोदी हे कोटेचा यांच्या प्रचारासाठी येथे आले; मात्र या मतदारसंघात सुरुवातीपासूनच बदलाचे वारे दिसत होते. घाटकोपर पश्चिम आणि पूर्व हे भाग भाजपचे हुकमी मतदारसंघ होते; मात्र या मतदारसंघांमध्ये आघाडीचे संजय पाटील यांना भरघोस मतदान झाले. भांडुप या होमपीचवरही पाटील यांना चांगली मते मिळाली आहेत. या मतदारसंघातील आज आघाडीच्या एकत्रित कामगिरीचा विजय झाला आहे.
...
ईशान्य मुंबई निकाल
संजय दिना पाटील (ठाकरे गट) - ४,५०,९३७
मताधिक्य - २९,८६१
मिहीर कोटेचा (भाजप) - ४,२१,०७६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com