उत्तर मध्य मुंबई - वार्तापत्र

उत्तर मध्य मुंबई - वार्तापत्र

उत्तर मध्य मुंबई - वार्तापत्र

गायकवाड यांची निकमांना धोबीपछाड!
५९ हजारांचे मताधिक्य तोडत मिळवला विजय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सकाळपासून पिछाडीवर असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी अखेरच्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांना जबरदस्त धोबीपछाड दिली. निकम यांनी घेतलेले सुमारे ५९ हजार मतांची आघाडी त्यांनी मोडून काढत १७व्या फेरीत ७९३ मतांची आघाडी घेत आपली विजयी वाटचाल सुरू केली. दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य कमी- जास्त होताना दिसले. मात्र, अखेरच्या फेरीत गायकवाड यांनी सुमारे १६ हजार ५१४ मतांची आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा मिळवला.
भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सलग दोन वेळा विजय मिळवल्याने त्यांना हॅटट्रिक करण्याची संधी आली होती. सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यापासून उज्ज्वल निकम यांना पहिल्या फेरीपासून मताधिक्य घेण्यास सुरुवात केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. प्रत्येक फेरीला पाच-सात हजार मताधिक्य मिळत गेल्याने १३व्या फेरीअखेरपर्यंत निकम यांनी ५९ हजार मतांची मोठी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी पुढील तीन-चार फेऱ्यांमध्ये मताधिक्य मोडून काढत १७व्या फेरीत आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
----------------------------
अखेरपर्यंत अटीतटीचा सामना
या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात चांगलाच अटीतटीचा सामना रंगला होता. वर्षा गायकवाड यांना प्रथमच ७९३ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर पुढील फेरीत त्यांचे मताधिक्य ३१३ पर्यंत खाली आले. तर उज्ज्वल निकम यांना १७६ मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक चांगलीच वाढली. त्यानंतरच्या मतमोजणीत गायकवाड यांनी जवळपास तीन हजार मतांची आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
-----------
ढोल-ताशे माघारी पाठवले
उज्ज्वल निकम यांना ५० हजारहून अधिक मताधिक्य मिळाल्याने कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा, फटाका, गुलालाची तयारी केली होती. मात्र, दुपारनंतरच्या मतमोजणीचे चित्र पालटले. त्यामुळे आणलेले ढोल-ताशा, गुलाल सुमडित माघारी पाठवण्याची नामुष्की पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर ओढवली.
--------
- रखरखत्या उन्हातही मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
- सकाळपासून उज्ज्वल निकम यांची आघाडी. दुपारनंतर झोपडपट्टी परिसरातील मजमोजणी सुरू झाल्याने पारडे फिरले
- चार फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेत कायम ठेवले
- सकाळपासून जल्लोष करणारे भाजप कार्यकर्ते दुपारी गायब
- अनेकांनी मोबाईलवर निवडणूक निकाल पाहिला
--------------
ग्राफिक्स -
- वर्षा गायकवाड (काँग्रेस ) - ४,४५,५४५
- ॲड. उज्ज्वल निकम (भाजप) - ४,२९,०३१
- मताधिक्य - १६,५१४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com