ठाण्यात विजयाचा गुलाल उधळला

ठाण्यात विजयाचा गुलाल उधळला

ठाण्यात विजयाचा गुलाल उधळला
- शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत ठाण्यात शिवसेना शिंदे गटाने विजयाचा जल्लोष केला. ठाणे लोकसभा निवडणुकीत नरेश म्हस्के यांनी ७ लाख ३२ हजार १०९ इतकी मते मिळवत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा हॅट्ट्रिकचा रथ रोखला आहे. अटीतटीच्या लढतीत विचारे यांना ५ लाख १५ हजार ०१३ मते मिळाली असून म्हस्के यांनी तब्बल २ लाख १७ हजार ७६८ मतांच्या आघाडीने विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १३ लाख ३६५ इतके मतदान झाले. विजयी आकडा गाठण्यासाठी उमेदवाराला किमान साडे सहा लाखांपेक्षा जास्तीचा आकडा पार करणे आवश्यक होते. या रणनीतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी बाजी मारली. त्यांनी २०१४ पासून सलग दोन वेळा ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे २०१९ साली राजन विचारे यांना मिळालेल्या ७ लाख ४० हजार ९६९ मतांच्या जवळ नरेश म्हस्के खासदारकीच्या पहिल्याच निवडणुकीत पोहोचले असले तरी त्यांचा रेकॉर्ड तोडता आला नाही. महायुतीचे उमेदवार असल्यामुळे नरेश म्हस्के यांना भाजपच्या मतांची मदत मिळाली. याशिवाय शिवसेना शिंदे गटाने शेवटच्या १० दिवसांत ऐरोली, बेलापूर ते मिरा-भाईंदरपर्यंतचा भाग पिंजून काढला. महिला बचत गट, महिला आघाडीचीही शक्ती या विजयामागे भक्कम उभी राहिली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केल्यामुळे त्यांना बळ मिळाले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा गाजली. निष्ठेच्या जोरावर राजन विचारे निवडणुकीच्या मैदानात उतरले, पण शिवसेनेचा बालेकिल्ला आणि भाजपचा गड असे समीकरण असलेल्या ठाण्यात त्यांना मतांचा तोटा झाल्याने आतापर्यंत लढवलेल्या निवडणुकीत आयुष्यात पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.

तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा नोटा
शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी ७,३२,१०९ मते मिळवली असून दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे आहेत. त्यांना ५,१५,०१३ मते मिळाली. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळीही नोटांचा पाऊस पडाला असून २०१९ प्रमाणे २०२४ मध्येही नोटांची संख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावेळी १७ हजार ७६८ इतक्या प्रमाणात नोटांची नोंद झाली आहे. गेल्या निवडणुकीत ही संख्या २० हजारांच्या घरात होती, तर चौथ्या क्रमांकावर बसपचे संतोष भालेराव असून त्यांना १०,६०२ इतकी मते मिळाली.


...
हा विजय नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मेहनत यातून साकार झालेला आहे. सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा विजय आहे. आनंद दिघेंचा खरा शिष्य कोण हे जनतेने दाखवून दिले. आनंद नगरमध्ये राहणारा नरेश म्हस्के याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १२ दिवसांत खासदार बनवले. एकनाथ शिंदेंनी माझ्या पाठीशी हात ठेवला आणि नगरसेवक, माजी महापौराचा खासदार बनवला.
- नरेश म्हस्के, विजयी उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com