मुंबईकरांचा महाविकास आघाडीला कौल

मुंबईकरांचा महाविकास आघाडीला कौल

मुंबईत ठाकरे; ठाण्यात शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई/ठाणे, ता. ४ ः पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन गटांनी अनुक्रमे मुंबई आणि ठाणे हे आपले गड राखले. मुंबईकरांनी यावेळी महाविकास आघाडीला झुकते माप दिले आहे. मुंबईतील सहा जागांपैकी महाविकास आघाडीला चार तर महायुतीला दोन जागांवर विजय मिळाला आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) गटाचे अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला, अन्यथा महाविकास आघाडीच्या वाट्याला पाच जागा मिळाल्या असत्या. या विजयामुळे आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीत भाजपचा मार्ग खडतड असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत मनसेपुढे अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे.
मुंबईतील महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या चार जागा, तर काँग्रेसने उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा लढवल्या. महायुतीत भाजपच्या वाट्याला उत्तर मुंबई, ईशान्य आणि उत्तर मध्य मुंबई हे तीन तर शिवसेना (शिंदे) गटाने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. प्रत्यक्ष मतमोजणीत मुंबईकरांनी महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिला आहे, तर भाजपच्या दोन जागा घटल्या असून फेरमतमोजणीत शिंदे गटाच्या वायकर यांचा फेरमतमोजणीत ४८ मतांनी विजय झाल्यामुळे पक्षाने मुंबईत आपले खाते उघडले आहे.
...
शिवसेनेचा प्रभाव कायम
पक्षात फूट पडून, नवे पक्ष चिन्ह मिळूनही शिवसेनेने मुंबईत आपला प्रभाव कायम राखला आहे. यासोबत काँग्रेसलाही एकुलता एक विजय मिळवून देण्यात मदत केली आहे. यावेळी मराठी माणूस शिवसेनेकडे एकटवला होता, तर मुस्लिम, दलितांची कधीही न मिळणारी मतेही यावेळी पहिल्यांदाच शिवसेनेच्या पारड्यात पडली. त्यामुळे मुंबईत आवाज शिवसेनेचा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केले आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनीदेखील उज्ज्वल निकम यांची ६३ हजारांची आघाडी मोडून काढत अखेरच्या फेरीत विजय मिळवला. या विजयामुळे मुंबईत काँग्रेसने आपले अस्तित्व राखले आहे. दुसऱ्या जागेवर काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.
...
भाजपला दणका
२०१९ मध्ये तीन जागा जिंकलेल्या भाजपला यावेळी केवळ एका जागेवर विजय मिळाला. उत्तर मुंबई या पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्यात पियूष गोयल यांनी आरामात साडेतीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
...
ठाणे-कल्याण शिंदेंकडे
लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला गड राखण्यात यश आले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला आहे. सुमारे दोन लाख मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले. दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला. या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या. जिल्ह्यात महायुतीच्या खात्यात दोन जागा आल्या असल्या तरी भिवंडीत भाजपचे कमळ कोमेजले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी पराभव केला असून ते जायंट किलर ठरले आहेत.
रायगड मतदारसंघात मतदारांनी धर्म, जातीच्या राजकारणाला जवळ न करता संकटात धावून आलेल्या लोकप्रतिनिधीला जवळ केल्याचे प्रत्यक्ष निकालाच्या आकडेवारीवरून दिसून आले. कोरोना, निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात मतदारसंघात दररोज सक्रिय असणाऱ्या सुनील तटकरे यांच्या बाजूने मतदान करत मतदारांनी त्यांना विजयी केले. पालघर लोकसभेत भाजपच्या डॉ. हेमंत सवरा यांनी विजयश्री खेचून आणली. येथे राममंदिरापासून विकासापर्यंतचे मुद्दे कामी आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com