धनुष्य बाणासोबत माशालही तळपली

धनुष्य बाणासोबत माशालही तळपली

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत बाजी मारत विजयाची हॅट्ट्रिक केली, मात्र त्यांना अपेक्षित असे मताधिक्य त्यांना मिळवता आलेले नाही. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी शिंदे गटाला काँटे की टक्कर दिल्याचे चित्र निकालावरून स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या तुलनेत ३१ हजार मतांचे लीड श्रीकांत यांना मिळवता आले, तर कळवा मुंब्रा येथे शिंदे यांना सर्वाधिक फटका बसला असून कल्याण ग्रामीणने त्यांना तारल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वैशाली दरेकर यांचा नवखा चेहरा आणि कार्यकर्त्यांची तगडी फळी नसतानादेखील त्यांनी पावणे चार लाख मते घेतली. यामुळे धनुष्यबाणासोबतच मशालीला देखील चांगले मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ असून येथे ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण मतदारसंघात जास्तीत जास्त विकासनिधी मंजूर केला आहे, तसेच विविध विकासकामे, कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहात मतदारांना मुलासाठी साद घातली होती. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक आपण करणार याची खात्री खासदार शिंदे यांना आधीपासूनच होती. विजयासोबतच यंदा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली होती.

श्रीकांत शिंदे यांनी फाजील आत्मविश्वास ठेवू नका, गाफील राहू नका, प्रत्येक मतदारांपर्यंत विकासकामे पोहोचवण्याचा प्रयत्न करा, असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले होते. स्वत: मतदारांच्या गाठीभेटी घेताना, स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते चौकसभा, मेळाव्यांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करत होते, तसेच जुने जाणते शिवसैनिक, कार्यकर्त्यांना आपल्या गोटात सहभागी करण्यासाठी शिंदे गटाकडून विविध प्रयोग सुरू होते. याच जोरावर डॉ. शिंदे यांनी पाच लाख पारचा नारा दिला होता, मात्र हे उद्दिष्ट गाठणे तितकेसे सोपे नव्हते. भाजपचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघात डॉ. शिंदे यांना विरोध सुप्त विरोध होता. शिंदे विक्रमी मतांनी निवडून आल्यास भाजपला डोईजड होण्याची भीती होती. त्यामुळे भाजपकडूनच मताधिक्य रोखण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

२० हजार शिवदूतांची नेमणूक
शिंदेनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी २० हजार शिवदूतांची नेमणूक केली होती. या शिवदूतांना प्रत्येकी २० कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे चार लाखांची हक्काची मते त्यांना मिळणे अपेक्षित होते, परंतु त्यात ते सफल झाले नाहीत. दुसरीकडे वैशाली राणे यांच्याकडून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर निवडणुकीचा प्रचार सुरू होता. संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावून महायुतीकडून प्रचार सुरू होता, तर ठाकरे गटाकडून ‘निष्ठावान विरुद्ध गद्दार’ असाच प्रचार सुरू होता. वैशाली राणे यांच्या प्रचार सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर पावसात मतदारांना साद घातली होती, तसेच स्टार प्रचारक सुषमा अंधारे या मतदारसंघाचा वारंवार आढावा घेत होत्या. कल्याण पूर्व हा भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मतदारसंघ असून येथील भाजप-शिवसेना वादाचा फायदा दरेकर यांनी करून घेतला. त्यासोबतच कळवा मुंब्रा येथे मुस्लिमबहुल मते मिळविण्यात देखील दरेकर यांना यश आले.

विजयासाठी कसरत
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांना ५,५८,०२३ मते मिळाली होती. २०२४ च्या निवडणुकीत ५,८९६३६ मते मिळाली आहेत. याचाच अर्थ मागील निवडणुकीच्या तुलनेत केवळ ३१ हजार ६१३ जास्तीची मते शिंदेंना मिळाली. यातही कल्याण ग्रामीणमधून मनसेची साथ शिंदे यांना मिळाली आहे. जर कल्याण ग्रामीणची साथ मिळाली नसती, तर शिंदे यांना विजयासाठी आणखी कसरत करावी लागली असती. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना १ लाख ०२ हजार ०६३ मते मिळाली होती. २०२४ ला शिवसेनेत पडलेली फूट, शिंदे यांच्या विरोधातील वातावरण आणि अन्य परिस्थिती पाहता सुरुवातीला त्या अडीच लाखांचा लीड घेतील, असे म्हटले जात होते. मतदानाची टक्केवारी हाती आल्यानंतर दरेकर या तीन लाखांचा टप्पा पार करतील, असे म्हटले जात होते. त्याप्रमाणे त्यांनी तीन लाख ८० हजार मते मिळवित सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

कळवा मुंब्र्यात फटका
महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगरच्या तुलनेत मुंब्रा-कळवा परिसरात झालेले मतदान महायुतीला चिंतेत टाकणारे होते. कळवा मुंब्रा येथून दोन लाख १६ हजार १५९, तर कल्याण ग्रामीणमधून दोन लाख ३१ हजार १६२ आणि कल्याण पूर्वमधून १ लाख ५६ हजार २३५ मतदारांनी मतदान केले आहे. कळवा मुंब्रा येथे शिंदे यांना फटका बसला असून ६५ हजारांचा लीड येथे दरेकर यांना मिळाला आहे. वैशाली यांना येथून एक लाख ३५ हजार ४९६ मते मिळाली, तर श्रीकांत यांना ६९ हजार ९८८ मते मिळाली, तर कल्याण ग्रामीणमध्ये याच्या उलट चित्र आहे. येथे श्रीकांत यांनी ८६ हजारांचा लीड घेत १ लाख ५१ हजार ७०२ मते घेतली, तर वैशाली यांना ६५ हजार ४०७ मते मिळाली आहेत. आमदार राजू पाटील हे स्वतः शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात फिरत होते. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश आणि आमदार पाटील यांची विनंती स्वीकारत येथील मतदारांनी आपली मते ही शिंदेंच्या पारड्यात टाकली.


उमेदवारांना पडलेली मते
विधानसभा क्षेत्र वैशाली दरेकर राणे श्रीकांत शिंदे
अंबरनाथ ५८०२८ ९३६७०
उल्हासनगर ३१२४१ ८५६९८
कल्याण पूर्व ५४५३३ ८७१२९
डोंबिवली ३४५३१ ९९७३४
कल्याण ग्रामीण ६५४०७ १५१७०२
मुंब्रा कळवा १३५४९६ ६९९८८


कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
विधानसभा क्षेत्र एकूण मतदार मतदान केलेले मतदार एकूण टक्केवारी
अंबरनाथ - ३, ५३, ५५४ १, ६६, ४०७ ४७.०७ %.
उल्हासनगर - २, ५७,३६७ १,३१, ५०५ ५१.१० %
कल्याण पूर्व - २, ९९, ३८० १, ५६, २३५ ५२.१९ %
डोंबिवली - २, ७५,११० १, ४२, १४२ ५१.६७ %
कल्याण ग्रामीण - ४, ५३, १४९ २, ३१, १६२ ५१.०१ %
मुंब्रा कळवा - ४, ४३, ६६१, २, १६, १५९ ४८.७२ %

कल्याण लोकसभा तुलनात्मक आकडेवारी
विधानसभा क्षेत्र २०१९ २०२४
अंबरनाथ ४२.३१ ४७.०७
उल्हासनगर ४६.८२ ५१.१०
कल्याण पूर्व ४३.५३ ५२.१९
डोंबिवली ४०.७२ ५१.६७
कल्याण ग्रामीण ४६.३६ ५१.०१
मुंब्रा कळवा ४९.९४ ४८.७२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com