फलाट रुंदीकरणानंतर धावल्या ९०० गाड्या

फलाट रुंदीकरणानंतर धावल्या ९०० गाड्या

ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) : ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ च्या रुंदीकरणामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. फलाटाची रुंदी वाढल्याने त्यांना गाडीत चढणे, उतरणे सोपे झाले आहे. फलाटाची रुंदी वाढवताना रूळही मूळ जागेपासून सरकवण्यात आले आहेत. हे काम झाल्यानंतर या रुळावरून मेल, एक्स्प्रेससह सुमारे ९५०-१००० गाड्या धावल्या आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज सुमारे सहा ते साडेसहा लाख प्रवासी स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांना सामावून घेण्याची फलाटांची क्षमताही वाढणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच फलाट क्रमांक ५ ची रुंदी सुमारे हजार ते दीड हजार चौरस फूट वाढवली आहे. त्यामुळे या फलाटावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला दिलासा मिळाला आहे. रुंद झालेल्या जागेमुळे प्रवाशांची चढ-उतरण्यासाठी आणि गाडीची प्रतीक्षा करत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांची घुसमट कमी झाली आहे. या फलाटावरून रोज सुमारे २५० लोकल आणि ६० मेल, एक्स्प्रेस गाड्या धावतात. हा फलाट प्रवाशांच्या वापरासाठी रविवारी (ता. २) दुपारी १ वाजल्यापासून सुरू केला आहे. चार दिवसांपासून येथून सुमारे हजार गाड्या धावल्या; मात्र कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. एवढे चांगले काम रेल्वे विभागातील अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी केली आहेत, अशी माहिती स्थानक व्यवस्थापक केशव तावडे यांनी दिली.

नोकरीनिमित्त भायखळा ते ठाणे असा रोज प्रवास आहे. त्यामुळे ठाण्यात उतरण्यासाठी फलाट क्रमांक ५ चा वापर करतो. पूर्वी सायंकाळी या फलाटावर उतरणे मोठे कठीण काम होते. आधीच गाडी पकडण्यासाठी लोक गर्दी करून उभे असतात. त्यात जागा कमी असल्याने उतरण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी वाट करणे म्हणजे कसरतच असायची. पण, आता फलाटाची रुंदी वाढवल्याने गाडीतून उतरून पुढे जाणे सोपे झाले आहे.
- रमेश पगारे, प्रवासी, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com