झोपडपट्टी, दलित, मुस्लिमबहुल भागाची काँग्रेसला साथ

झोपडपट्टी, दलित, मुस्लिमबहुल भागाची काँग्रेसला साथ

झोपडपट्टी, दलित, मुस्लिमबहुल भागाची काँग्रेसला साथ
- चांदीवली, कुर्ला, वांद्रे पूर्वतून वर्षा गायकवाडांना मोठे मताधिक्य
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतून एकमेव महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना झोपडपट्टी परिसराबरोबरच दलित आणि मुस्लिमबहुल भागातील मतदारांनी विजयाचा मार्ग दाखवल्याचे समोर आले आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील सहापैकी चांदिवली, कुर्ला आणि वांद्रे पूर्व विधानसभेतील मतदारांनी वर्षा गायकवाड यांना भरभरून मतदान केले. त्यामुळेच त्यांना मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य तोडून विजय मिळवणे शक्य झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कुर्ला, चांदिवली, कलिना, विलेपार्ले, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी कुर्ला, चांदिवली आणि वांद्रे पूर्व या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित वर्गाचे प्राबल्य असून बहुतांश परिसर झोपडपट्टीचा आहे, तर उर्वरित विलेपार्ले, कलिना आणि वांद्रे पश्चिम या मतदारसंघात उच्चभ्रु आणि सदन वर्गाची मोठी वस्ती आहे. सदर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत, तर इतर दलित, मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असलेल्या झोपडपट्टी परिसरातील मतदारांनी वर्षा गायकवाड यांना पसंती दिली आहे.

अन् पारडे फिरले
मतमोजणीची सुरुवात उच्चभ्रु वस्तीतील मतदान केंद्रापासून झाली. त्यामुळे सकाळपासून १४ व्या फेरीपर्यंत उज्ज्वल निकम यांना मोठे मताधिक्य होते, मात्र मतमोजणीच्या फेऱ्या झोपडपट्टी परिसरात जाताच वर्षा गायवाड यांनी दुपारनंतर कमबॅक करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सातत्य राहिल्यानेच मताधिक्याचे पारडे निकम यांच्या बाजूकडून गायकवाड यांच्या बाजूला फिरले. त्यामुळेच त्यांचा विजय सुकर झाल्याची राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे.

स्थानिक विरुद्ध उपरा कळीचा मुद्दा
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरा हा मुद्दा कळीचा ठरल्याचे दिसून आले. उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीने स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार असा प्रचार केला. चाळीत-गल्लीत राहणाऱ्या निकमांना येथील समस्या कशा समजणार, असा प्रचार केला जात होता. त्याला मतदारांनीही चांगली साथ दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

विधानसभानिहाय मिळालेली मते
वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम
विलेपार्ले ४७ हजार १६ ९८ हजार ३४१
चांदिवली १ लाख २ हजार ९८५ ९८ हजार ६६१
कुर्ला ८२ हदार ११७ ५८ हजार ५५३
कलिना ६७ हजार ६२० ५१ हजार ३२८
वांद्रे पूर्व ७५ हजार १३ ४७ हजार ५५१
वांद्रे पश्चिम ७९ हजार ३४७ ७२ हजार ९५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com