महेश गायकवाड यांना
गोळ्या घालण्याची धमकी

महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. आता त्यांना दीपक कदम नामक व्‍यक्तीने समाजमाध्यमांवरून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
द्वारली येथील जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहेत. महेश गायकवाड हे बरे होऊन घरी परतल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. यात शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयामुळे आनंदाचे वातावरण असताना आलेल्या या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या. मी आठ गोळ्या घालीन’, अशी धमकी दीपक कदम नावाच्या व्यक्तीने फेसबुकवरून दिली आहे. या धमकीनंतर महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात कदम याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. धमकी देणारा कदम हा व्यक्ती कोण आहे? त्याने धमकी का दिली, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com