उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची विनंती

उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची विनंती

मुंबई, ता. ५ ः महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिंकून आणण्यासाठी आपल्याला सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला केली. आज निकालांचा आढावा घेण्यासाठी पक्षाची बैठक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी संपूर्णत: माझी एकट्याची असल्याचे फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले. त्यानंतर लगेचच झालेल्या पत्रकार परिषदेत पुढचे सहा महिने विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मला सरकारमधून मोकळे करून पक्षकार्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचे त्यांनी या वेळी पत्रकारांना सांगितले.

उपमुख्यमंत्रिपद सांभाळण्याऐवजी पक्षाला पूर्ण वेळ देणे आवडेल, असे आपण श्रेष्ठींना सांगणार आहोत, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, तेव्हादेखील फडणवीस यांनी आपण सरकारचा भाग नसू, असे घोषित केले होते; मात्र पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस उपमुख्यमंत्री होतील, अशी जाहीर घोषणा केल्यानंतर त्यांना पक्षादेश पाळावा लागला. आता पुन्हा त्यांनी सत्तेच्या बाहेर पडून पक्षकार्य करण्याची परवानगी मागितली आहे.

या वेळच्या निवडणुकीत संविधान बदलण्याचे नॅरेटिव्ह विरोधी पक्षांनी चालवले. आम्ही ते नॅरेटिव्ह परतवून लावण्यात कमी पडलो. शिवाय आमच्या काही उमेदवारांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात अॅन्टी इन्कम्बन्सी होती. त्याकडे आम्ही लक्ष दिले नाही. निकालांमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असल्या, तरी महायुतीला जनतेने नाकारले, असे म्हणता येणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. आठ जागा आम्ही चार टक्क्यांपेक्षा कमी मतांच्या फरकाने हरलो.

महायुतीला जनतेने नाकारले नाही
निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के, तर महायुतीला ४३.६० टक्के मते मिळाली आहेत. हा फरक अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहे. मतांचाच विचार करायचा झाल्यास महाविकास आघाडीला दोन कोटी ५० लाख मते मिळाली आहेत; तर महायुतीला दोन कोटी ४८ लाख मते मिळाली आहेत. हा फरक दोन लाखांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे महायुतीला जनतेने नाकारले, असे म्हणता येणार नाही. मुंबईचाच विचार करायचा झाल्यास महाविकास आघाडीला मुंबईत २४ लाख ६२ हजार मते मिळाली; तर आम्हाला २६ लाख ६७ हजार मते मिळाली आहेत. हा फरक फार नगण्य असल्याचे या वेळी फडणवीस यांनी सांगितले.

पराभवाची जबाबदारी एकट्याची
भाजपच्या पराभवाची जबाबदारी एकट्यावर घेतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशीष शेलार यांनी मात्र उत्तम काम केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विनंती अमान्य : प्रदेशाध्यक्ष
घोषणेची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने धक्का बसलेल्या भाजप नेत्यांनी दहा मिनिटांनंतर पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस यांची ही भूमिका अमान्य असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी स्पष्‍ट केले. फडणवीस यांनी सरकारचे काम दोन दिवस करावे आणि बाकीचे पाच दिवस पक्षकार्याला द्यावेत, असे बावनकुळे म्हणाले. मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे तसेच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेही या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com