सिव्हील रुग्णालयात महिलेच्या जिभेवर कर्करोगाची शस्त्रक्रिया

सिव्हील रुग्णालयात महिलेच्या जिभेवर कर्करोगाची शस्त्रक्रिया

सामान्य रुग्णालयात महिलेच्या जिभेवर कर्करोगाची शस्त्रक्रिया

ठाणे शहर, ता. ६ (बातमीदार) : मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयात अथवा मुंबईत टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते; मात्र ज्यांना मौखिक कर्करोग शस्त्रक्रिया करण्याचा खर्च परवडत नाही, अशांसाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय वरदान ठरत आहे. या ठिकाणी मौखिक कर्करोगावर उपचार केले जात आहेत. एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगाची यशस्वी नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मुंबईत राहणाऱ्या सरिता या ५८ वर्षीय महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती. बोलताना आणि जेवताना भरपूर त्रास होत असे. या समस्येचे निदान करण्यासाठी त्यांनी एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. यात त्यांना जिभेचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी होणारा खर्च साधारण अडीच ते तीन लाख रुपये सांगण्यात आला. कौटुंबिक परिस्थिती साधारण असल्याने जिभेवरील कर्करोगाचे उपचार कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. यावर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार होत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या जिभेवर कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी माहिती दंतशल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.

प्रथम सरिता यांची रक्तचाचणी करण्यात आली. शारीरिक स्वास्थ्याची तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली गेली. दरम्यान सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑनको सर्जन डॉ. हितेश सिंगवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया दंतशल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, डॉ. रूपाली यादव, डॉ. संकेत शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.


खासगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणे सर्वांना परवडणारे नसते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते; मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. यासाठी खासगी कर्करोगतज्ज्ञांना बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे


तंबाखू, मशेरी लावण्याच्या सवयीमुळे या महिलेला मौखिक कर्करोग झाला असावा. तंबाखूसेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दंत विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मौखिक कर्करोगाविषयी माहिती दिली जाते. गेल्या वर्षभरात १५ हजारांवर नागरिकांचे मौखिक कर्करोगविषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आली.
- डॉ. अर्चना पवार, दंत शल्य चिकित्सक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com