सहा जलकुंभ असूनही टिटवाळ्यात पाणी समस्या

सहा जलकुंभ असूनही टिटवाळ्यात पाणी समस्या

टिटवाळ्यात पाणीबाणी
सहापैकी दोन जलकुंभ वापराविना; एकाला गळती
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण- डोंबिवली महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या मांडा टिटवाळ्यातील नागरिक पाणी समस्येने त्रस्त आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विकतचे पाणी आणावे लागत आहे. पाणीसाठ्यासाठी उभारलेल्या सहा जल कुंभांपैकी तीन जलकुंभच सुरू आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. यातील दोन जलकुंभ उद्घाटन होऊनदेखील सुरू केलेले नाहीत. तर अन्य एका ठिकाणी जलकुंभाला गळती लागल्याचे समोर आले आहे.

मांडा टिटवाळा परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचबरोबर अधिकृत टॉवरची उभारणीदेखील झपाट्याने वाढत आहे. यामुळे परिसरात नागरी वसाहती वाढल्याने लोकसंख्येच्या आकड्यातही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. अनधिकृत चाळीचा डोलारा उभा राहिल्याने हजारोंच्या संख्येने पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिनीला जोडणी मारत पाणी परस्पर उचलण्याचे काम मोठ्या जोमात सुरू आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अशाच काही नळजोडण्या तोडण्याची मोहीम आखली होती. या मोहिमेंतर्गत शेकडोंच्या संख्येत अनधिकृत नळजोडण्या तोडल्या होत्या; मात्र सकाळी तोडलेल्या नळजोडण्या सायंकाळच्या सुमारास पुन्हा सुरळीतपणे जोडण्याचा प्रकार घडला. यामुळे पुढे जात असणारा पाणीपुरवठा अत्यंत मंदगतीने होण्यास कारणीभूत ठरला जाऊ लागला आहे. या अनधिकृत पाणीचोरीमुळे मांडा टिटवाळ्यामध्ये पाणी वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाढत्या नागरीकरणाने जुन्या पाणीवितरण व्यवस्थेत पालिका प्रशासनाने कुठलाच बदल केला नाही. परिणामी, मांडा टिटवाळावासीयांना पाणीप्रश्न भेडसावत आहे. सहा जलकुंभ असूनही त्यातील तीन जलकुंभ सुरू आहेत. काळू नदीजवळील एका जलकुंभाला गळती लागल्याने तो अर्धवटच भरला जात आहे. मोठ्या हौसेने रवींद्र आर्केड येथे दोन जलकुंभ पालिकेने उभारत त्याचे उद्घाटनही केले; मात्र उद्घाटन होऊनदेखील ते अद्यापपर्यंत सुरू केलेले नाहीत.

पंपगृहात तांत्रिक बिघाड
टिटवाळा परिसरातील काळू नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी पालिकेने प्रयत्न केल्यास पाणीसाठ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पंपगृहातील पंपसामग्री जुनाट झाल्याने नेहमीच येथे तांत्रिक बिघाड होत आहे. मोहिली ते माता मंदिर रोडनजीक हजारोंच्या संख्येत अनधिकृतपणे नळजोडणी मारल्याने पाणीपुरवठ्यावर याचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे. इंदिरानगर परिसरात अद्यापही पालिकेला गेल्या वीस वर्षांपासून टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागत आहे. गेल्या वीस वर्षांपासून पालिका प्रशासन नियमितपणे पाण्याचा टँकर या वसाहतीला देत आहे. त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन अद्यापही अपयशी ठरले गेले आहे.

लाक्षणिक उपोषणाचा इशारा
मांडा टिटवाळ्यातील पाणी वितरणाकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने पाणी समस्येत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने पाणीप्रश्नावर लक्ष न दिल्यास येत्या काही दिवसांत शिवसेना लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख विजय देशेकर यांनी पालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com