तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राणिगणना गुलदस्त्यात

तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राणिगणना गुलदस्त्यात

विरार, ता. १० (बातमीदार) : वसईच्या किल्ल्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या बिबट्याचे गूढ अजूनही उलगडले नाही. हा बिबट्या कुठून आला, याबाबत वन विभागाच्या प्राणिगणनेत माहिती मिळेल, असे वाटत होते. परंतु प्राणिगणना होऊन जवळपास १५ दिवस झाले, तरी वन विभागाकडून माहितीच देण्यात आली नाही. दुसऱ्या बाजूला वन विभागाचे अधिकारी फक्त डोंगररांगात उभारण्यात येणारी अनधिकृत घरे यांच्याकडून वसुली करत आहेत. त्यामुळे प्राणिगणनाच झाली नसावी, असे नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
वसई तालुक्यात तुंगारेश्वर हे राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. त्याअनुषंगाने दरवर्षी तुंगारेश्वर पर्वतात पाणवठ्याच्या जागी कॅमेरे लावून प्राण्यांची पारंपरिक गणना करण्याची पद्धत आहे. यावर्षी प्राण्यांची गणना झाली असेल, तर जंगलात किती बिबटे, वाघ किंवा इतर प्राणी आहेत, याची माहिती मिळाली असती. गेल्या वर्षीच्या गणनेवर बोट ठेवल्यानंतर यावर्षी गोखिवरे वन विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राणीच गायब झालेत का? की गतवेळेप्रमाणे यंदाही प्राणिगणना सदोष असल्याची भीती वन विभागाला वाटत आहे? असा सवाल प्राणिमित्र आणि नागरिक करत आहेत. काही दिवसांपूर्वी वसईच्या किल्ल्यात आलेल्या बिबट्याने १५ दिवस येथील नागरिकांना वेठीस धरले होते. हा बिबट्या कुठून आला, हे समजण्यापलीकडे होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष प्राणिगणनेकडे होते. मात्र, या गणनेत काय आढळले याची माहिती देण्यास वन विभाग टाळाटाळ करत आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ
गोखिवरे वन परिक्षेत्राचे वन अधिकारी संदीप चौरे यांच्याशी संपर्क साधला असता तुंगारेश्वर पर्वतातील प्राणिगणनेबाबत आज माहिती देतो, उद्या देतो असे सांगून त्यांनी टोळवाटोळवी सुरू केली आहे. त्यांना व्हॉटसॲपद्वारे माहिती देऊनही त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ सुरू ठेवली आहे. त्यामुळे तुंगारेश्वर पर्वतातील प्राणिगणनेबद्दलचे गूढ वाढले आहे.

यावर्षी वसई विजय दिन आणि बुद्ध पौर्णिमा एकाच दिवशी होती. याच दिवशी दरवर्षी जंगलात वन विभागाकडून प्राणिगणना करण्यात येते. जंगलात कोणत्या प्रकारचे प्राणी आणि किती आहेत, याची माहिती मिळते. जर ही माहिती मिळाली असती तर वसई किल्ल्यात आलेल्या बिबट्याचे गूढही उकलले असते.
- संतोष वळवईकर, माजी नगरसेवक, वसई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com