पाटलांचे विजयाचे गणित चुकले

पाटलांचे विजयाचे गणित चुकले

मुरबाड, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा निवडणुकीत मुरबाड व शहापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांना कुणबी मतदारांनी भरभरून मते दिल्याने भाजपचे कपिल पाटील यांचा पराभव झाल्याची मतांची आकडेवारी बोलत आहे. सांबरे यांना मुरबाड मतदारसंघात ६४ हजार ७१३ आणि शहापूर मतदारसंघात ७४ हजार ६८९ मते मिळाली आहेत. या एकूण मतांची बेरीज एक लाख ३९ हजार ४०२ होते.
सांबरे यांना ज्या गावातून ही मते मिळाली, त्यामध्ये कुणबी समाजाच्या मतदारांची संख्या जास्त आहे. या गावात बहुतेक ठिकाणी सर्वांत जास्त मते सांबरे यांना मिळाली आहेत. या गावांची नावे पाहिली, तर ती मते पाटील यांच्याविरोधी नव्हती; पण या गावात जातीचे विष ठासून पेरल्याने ती मते सांबरे यांना मिळाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कपिल पाटील यांना मुरबाड मतदारसंघात १,०६,३६९ मते मिळाली आहेत. त्यांना २८,८०१ मतांची आघाडी मिळाली आहे. तर शहापूर मतदारसंघात फक्त ४६ हजार ५२१ मते मिळाली. तर नीलेश सांबरे यांना ७४ हजार ६८९ मते मिळाली आहेत. त्यां‍ना या दोन तालुक्यांत मिळालेल्या १,३९,४०२ मतांपैकी अर्धी मते ७० हजार जरी पाटील यांना मिळाली असती, तर विजयाचे गणित बदलले असते. मुरबाड व शहापूर या दोन्ही तालुक्यांत कुणबीबहुल गावात जातीय निकष निवडणुकीपूर्वीच धगधगत होता. त्यामध्ये आमदार किसन कथोरे विरुद्ध कपिल पाटील असा बार ठासून भरलेला होता. त्याचा परिणाम सांबरे यांना वाढीव मते मिळाली. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न करता खंबीरपणे सांबरेंच्या पाठीशी होते.

उमेदवारांना मिळालेली मते
कपिल पाटील
मुरबाड मतदारसंघ ... १०६३६९
शहापूर मतदारसंघ ... ४३५२१

बाळ्यामामा म्हात्रे
मुरबाड मतदारसंघ ... ७७५६८
शहापूर मतदारसंघ ... ५४७०१

नीलेश सांबरे
मुरबाड ६४७१३
शहापूर ७४६८९

(बाळ्या मामा म्हात्रे ६६१२१ मतांनी विजयी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com