पर्यावरण दिन साजरा

पर्यावरण दिन साजरा

नूतन विद्यालयात पर्यावरण दिन साजरा
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण येथील नूतन विद्यालयात अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त पर्यावरणाची महती आणि आपले कर्तव्य याविषयी सहायक शिक्षिका प्राजक्ता सोनवणे यांनी व्याख्यान दिले. दहावीमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी चार वर्षांपासून रोपण करत असलेल्या आणि आता बहरलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपाली साबळे आदींनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला. कलाशिक्षक सांस्कृतिक प्रमुख श्रीहरी पवळे, शिक्षक वृंद, दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

वनशक्ती संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम
ठाणे, ता. ६ (बातमीदार) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनशक्ती संस्थेतर्फे महाराष्ट्र वन विभाग आणि एन्व्हॉयरमेंट लाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने नेरूळ पाम बीच रोडवरील सारसोळे खारफुटीच्या जंगलात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत १२०० किलो कचरा गोळा करण्यात आला.
ठाणे खाडी आशिया खंडातील सर्वात मोठी असून ती जैवविविधतेने नटलेली आहे. परंतु, सांडपाणी आणि अविघटनशील कचऱ्यामुळे येथील जैवविविधता संकटात आली आहे. परिणामी, येथील स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. पावसाळ्यात अशा कचऱ्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळेच अशा स्वच्छता अभियानाची या ठिकाणी गरज असल्याने वनशक्ती संस्थेने स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी खाडीतील, खारफुटीच्या जंगलातील प्लास्टिक, थर्मोकोल, चपला आणि काचेच्या बाटल्या असा १२०० किलो कचरा गोळा केला. मोहिमेमध्ये नेरूळ येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालय आणि विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या ७० एनएसएस विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी, जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी वनशक्ती संस्थेतर्फे करण्यात आले. त्याचप्रमाणे सहभागी स्वयंसेवकांनी यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com