पवईतील ८०० झोपड्यांवर हातोडा

पवईतील ८०० झोपड्यांवर हातोडा

पवईतील ८०० झोपड्यांवर हातोडा
पावसाळ्यामुळे कारवाईला विरोध; रहिवासी-पोलिसांत संघर्ष
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः पवईतील जयभीमनगर झोपडपट्टीतील तब्बल ८०० झोपड्यांवर गुरुवारी (ता. ६) पालिकेने तोडक कारवाई केली. कोणतीही नोटीस न देता मोठा पोलिस फौजफाटा घेऊन पावसाळा तोंडावर असताना ही एकतर्फी कारवाई केल्‍याचा रहिवाशांचा आरोप आहे. ही जागा मोकळी करून एका बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप रहिवाशांनी बोलताना केला.
पवईतील जयभीमनगर ही झोपडपट्टी गेल्या २५ वर्षांपासून असून, त्यातील सुमारे ८०० झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवत त्यांना ४८८ अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कारवाई झाल्‍याने आम्‍ही जाणार कुठे, असा सवाल रहिवासी विचारत आहेत.
तोडक कारवाईसाठी जवळपास २५० ते ३०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. रहिवाशांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा पोलिसांचा आरोप आहे; तर कारवाईला न्यायालयाकडून स्‍थगिती आणण्यासाठी वेळ मागूनही आम्‍हाला दिला नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. या भागातील एका विकसकाच्या दबावाखाली पालिका, पोलिस आणि राजकारणी झोपड्यांच्या मुळावर उठले आहेत, असा रहिवाशांचा आरोप आहे. आम्‍ही गरीब, असहाय झोपडीधारक एकटे पडलो असून कुणीही साथ देण्यास पुढे सरसावत नाही, अशी खंत त्‍यांनी बोलून दाखवली.

पवईची ओळख ही मुंबई शहरात उच्चभ्रू परिसर म्हणून असली, तरी येथे अर्ध्यापर्यंत झोपडपट्टी, चाळकऱ्यांची वस्ती आहे. येथे रमाबाई आंबेडकरनगर, गौतमनगर, इंदिरानगर, महात्मा फुलेनगर, मोरारजीनगर, हरिओमनगर आदी महत्त्वाचे भाग हे झोपडपट्ट्यांनी व्यापले आहेत. या जयभीमनगर झोपडपट्टीत अशिक्षित, गोरगरीब, वंचित घटक राहत आहेत. २५ वर्षांपासून राहणारे रहिवासी आणि त्यांची घरे कशी बेकायदा ठरवली, असा सवाल संतप्त रहिवासी विचारीत आहेत.

झोपडीधारकांना धमकावल्‍यामुळे काही झोपडीधारक घरे रिकामी करत आहेत; पण अनेकांनी आपल्‍या अस्‍तित्वासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे ही एकतर्फी कारवाई झाली आहे.
- अविनाश हजारे, सामाजिक कार्यकर्ते

मतदान होताच कारवाई
लोकसभेच्या निवडणुकीत येथील झोपडीधारकांनी कामाला सुट्ट्या टाकून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यामुळे मतदान घेताना कायदेशीर आणि मतदान संपल्यानंतर हे लोक बेकायदा कसे, असा जळजळीत सवाल येथील रहिवासी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com