खंडोबा डोंगर परिसरात संरक्षण भिंतीचे अपूर्ण काम

खंडोबा डोंगर परिसरात संरक्षण भिंतीचे अपूर्ण काम

खंडोबा डोंगर परिसरात संरक्षक भिंतीचे अपूर्ण काम
जीवन तांबे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६; घाटकोपर येथील अमृतनगरमध्ये खंडोबा डोंगर परिसरात डोंगर पायथ्यावर संरक्षक भिंत बांधली आहे; मात्र तिचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला तरी भिंतीचे काम पूर्ण होईल का, असा सवाल इथल्या रहिवाशांचा आहे. घाटकोपर येथील अमृतनगर परिसरातील खंडोबा डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेली आहे. या घरांवर पावसाळ्यात डोंगरावरून माती कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. म्हाडाकडून काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे; तर काही भागात पावसाळा तोंडावर आला तरी अद्यापही भिंत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे या पावसाळ्यात घरांवर कधीही माती कोसळू शकते.

असल्फा परिसरातील गणेश गल्ली, सुभाष नगर आणि अन्सारी कंपाऊंड या भागात हीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दरड खाली असलेल्या गाळ्यावर पडते. या दोन्ही ठिकाणी दरड कोसळण्याची भीती राहिवाशांच्या मनात दाटली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या ठिकाणी राहत आहोत. पावसाळ्यातील चार महिन्यात आम्हाला दरड कोसळण्याची भीती असते. दोन वर्षांपूर्वी भिंत बांधली आहे; मात्र तिचे काम अपूर्णावस्थेत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित संरक्षक भिंत बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे; मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. एखादी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येते, असा संताप रहिवासी विठाबाई अलगुडे यांनी व्यक्त केला. दरडीच्या भीतीखाली आम्ही दिवस काढतो; मात्र शासन केवळ नोटीस चिटकवून जातात, असे तुळशीराम प्रजापती यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

पावसाळ्यात कसेतरी दिवस काढतो. भीती वाटते, पण आम्ही घरे सोडून कुठे जाणार. एकतर या ठिकाणी प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी अन्यथा आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे.
- लता पवार, स्थानिक रहिवासी
...
आमदार, नगरसेवकांना सरंक्षक भिंतीबाबत विचारणा केली असता काहीही उत्तरे देत नाही. शेजारी सरंक्षक भिंत बांधली जात असताना या बाजूला भिंत कधी बांधणार, अशी विचारणा केल्यावर निवडणूक झाल्यावर बांधण्यात येईल, असे उत्तर दिले. निवडणुका संपल्या, आता पावसाळा सुरू झाला आता तरी संरक्षण भिंत बांधा.
संजीव मिश्रा, स्थानिक रहिवासी
..
डोंगरावरील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे द्यायला हवीत. प्रशासनाने पुन्हा या जागेवर घरे होणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी. पार्कसाईट, खंडोबा टेकडीवर जागाच शिल्लक नसल्याने संरक्षक भिंत उभारायची कशी, हा प्रश्न पडत आहे.
सुरेश पाटील - विभागप्रमुख (ठाकरे गट)
...
मुंबई पालिकेची नोटीस
विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम) भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल, असे एन’ विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com