बुलडोझरने संसारांची राखरांगोळ

बुलडोझरने संसारांची राखरांगोळ

चेंबूर, ता. ६ (बातमीदार)ः मुंबईच्या पवईतील जयभीम नगर येथील प्रशासकीय जागेवरील अतिक्रमणावर पालिका एस विभागाने तोडक कारवाई केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेच्या बुलडोझरने हजारो संसार बेघर झाले आहेत.
पवई येथील जयभीम नगर येथील चार एकरची जागा प्रशासकीय रहिवाशांना वसाहतीकरिता देण्यात आलेली आहे. या जागेवर ३० वर्षांपासून ६०० ते ७०० झोपड्या तर काही पक्की तर पत्र्यांची घरे आहेत. पालिकेच्या एस विभागाने २०१७ मध्ये ह्युमन राईट कमिशनने २००४ रोजी ही जागा खाली करण्याकरिता नोटीस बजावली होती, मात्र गुरुवारी अचानक एस विभाग अधिकारी पोलिस फौज फाट्यासह रहिवाशांच्या घरांवर बुलडोझर फिरविला. या कारवाईमुळे रहिवाशांची पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांबरोबर शाब्दिक बाचाबाची झाली, तसेच आक्रमक झालेल्या रहिवाशांना रोखण्यासाठी पोलिसांची जादा फौज मागवून झोपडपट्टीवासीयांवर लाठीचार्ज केला. विकासकाच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
-------------------------------
पालिका, बिल्डर, नेते संगनमताने कारवाई करीत आहेत. पालिका जबरदस्तीने नियम धाब्यावर बसवत आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. आम्ही न्यायालयीन लढा देणार आहे.
- नसीम खान, आमदार, काँग्रेस
.......….............................
एक मुलगा आहे. सून, मुलगी यांना मारहाण करण्यात आली आहे. सकाळपासून उपाशी आहोत. आमचा संसार उघड्यावर पडला आहे. पावसाळ्यात आम्ही राहायचे कुठं!, मायबाप सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.
- आरती पटणे, रहिवासी
.................................
या जागेवर गेली २५ ते ३० वर्षे राहत आहोत. मुलांचा जन्म या ठिकाणी झाला आहे. भर पावसाळ्यात आमच्या घरावर बुलडोझर फिरवून संसार उद्ध्वस्त केला. विकासकाने फुले, हनुमान नगर या ठिकाणी जागा देतो, असे आश्वासन दिले होते, मात्र आमची फसवणूक केली.
-पौर्णिमा वाकडे, रहिवासी
..................................
विकासक, पालिका, पोलिस यांनी बौद्ध वस्तीवर, समाजावर हल्ला केला. पावसाळ्यात कोणत्याही अनधिकृत व अधिकृत बाधकामांवर कारवाई करता कामा नये, असा जीआर असताना वस्तीवर कारवाई केली आहे. या रहिवाशांचे आधी पुनर्वसन केले पाहिजे.
- दीपक केदार, ऑल इंडिया पँथर सेना (राष्ट्रीय अध्यक्ष)
......................................
मी आठवीत शिकत आहे. घरे तोडल्याने सातवीचा निकाल, जातीचे दाखले व महत्त्वाची कागदपत्रे जागेवर आहेत. आता राहण्याचा मोठा प्रश्न आहे, तसेच महत्त्वाची कागदपत्रे नसल्याने शिक्षणावरच गदा आली आहे.
- मेघा निबोले, विद्यार्थिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com