नागरिकांच्या तक्रारीनंतर २४ तासात खड्डे बुजलेच पाहिजेत

नागरिकांच्या तक्रारीनंतर २४ तासात खड्डे बुजलेच पाहिजेत

२४ तासांत बुजवले जाणार खड्डे
पालिका अतिरिक्त आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पावसाळ्यात रस्‍त्‍यांवर खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त होताच २४ तासांत ते खड्डे बुजलेच पाहिजेत, असे निर्देश पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले. खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवता यावी, यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून दूरध्‍वनी, व्‍हॉटस्ॲप, मोबाईल ॲपसह समाजमाध्यमांद्वारे तक्रार करणे आता नागरिकांना सहज शक्‍य होणार आहे. या विविध पर्यांयाचा वापर करून तक्रार केल्‍यानंतर साधारणपणे २४ तासांच्‍या आत संबंधित अभियंत्‍यांनी व कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजवावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये, म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहेत, तसेच रस्त्यांची सुरू असलेली कामेही १० जूनपर्यंत पूर्ण करण्यासह वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिक, लोकप्रतिनिधी, समाजमाध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी शुक्रवारी (ता.७) आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
मुंबईतील काही रस्‍ते हे पालिका वगळता इतर प्राधिकरणांच्‍या किंवा सार्वजनिक संस्‍थांच्‍या अखत्‍यारितील आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने एमएमआरडीए, म्‍हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, भारतीय विमानतळ प्राधिकरण यासारख्‍या संस्‍थांचा समावेश आहे. दरम्यान, पालिकेच्‍या अखत्‍यारित येणाऱ्या रस्त्याच्या तक्रारींवर रस्‍ते व वाहतूक खात्‍याद्वारे निपटारा करण्यात येतो. त्यातच ही कारवाई लवकरात लवकर करता यावी, यादृष्‍टीने नागरिकांना देखील सहज-सुलभ पद्धतीने खड्डेविषयक तक्रार नोंदवता यावी, यासाठी महापालिकेने पारंपरिक पद्धतीने लेखी तक्रार करण्‍यासह तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे.


‘इंटिग्रेटेड डॅशबोर्ड’ची निर्मिती
मुंबईतील खड्ड्यांची तक्रार आता दूरध्‍वनी, व्‍हॉटस्ॲप आणि समाजमाध्यमांद्वारे नोंदविता येणार आहे. या सर्व माध्‍यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारी २४ तासांत निकाली काढण्‍यात येतील. या तक्रारी निपटारा पाहण्यासाठी ‘इंटिग्रेटेड डॅशबोर्ड’ विकसित केला जात आहे. जेणेकरून तक्रार निकाली निघते किंवा नाही, किती वेळात निकाली निघते, प्रलंबित असेल तर कधीपासून प्रलंबित आहे, निकाली निघालेल्या तक्रारींबाबत तक्रारदाराचा ‘फीडबॅक’ काय आहे, तक्रार निकाली निघाल्याबद्दल तक्रारदार समाधानी आहे का? या गोष्टींची माहिती या डॅशबोर्डद्वारे कळू शकेल. यासाठी ‘MyBMC Pothole FixIt’ या ॲपमध्ये वापरकर्ता स्नेही (युजर फ्रेंडली) बदल केले जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्‍त बांगर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com