बोईसर-चिल्हारचा प्रवास निसरडा

बोईसर-चिल्हारचा प्रवास निसरडा

मनोर, ता. १० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गासोबत तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या बोईसर-चिल्हार रस्त्यावर वाहनांमधून खडी, रेती आणि रेडिमिक्स काँक्रीटची गळती होत आहे. या रस्त्यावरील वळणाचा भाग आणि वाघोबा खिंडीच्या चढावावर सिमेंटमिश्रित खडी पडल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. त्यात रस्ता निसरडा
होत असल्याने अपघातांची भीती वाढली आहे. याबाबत वाहनचालक, ग्रामस्थ आणि प्रवाशांनी एमआयडीसीकडे तक्रारी केल्या होत्या. यासाठी चिल्हार-बोईसर रस्त्यावरील क्रशन आणि आरएमसी प्लांट उद्योजकांना मालवाहतूक करताना शिस्त लावण्यासाठी एमआयडीसीने मालाची गळती न करता वाहतूक करा; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, कारचालक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

चिल्हार-बोईसर रस्त्यावरून रेती, खडी व काँक्रीटच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या गळतीमुळे रस्त्याचे नुकसान होत आहे. यासाठी बोईसर पूर्वेकडील क्रशर आणि आरएमसी प्लांट उद्योजकांना जबाबदार धरत एमआयडीसीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग जोडणारा चिल्हार-बोईसर रस्ता एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक सुरू आहे. प्रवासी कार, बस आणि दुचाकी ही वाहनेही याच मार्गाचा वापर करतात. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरणाचे काम एमआयडीसीकडून करण्यात आले. रस्त्यालगत मोठ्या संख्येने स्टोनक्रशर आणि आरएमसी प्लॉट कार्यरत आहेत. या प्लांटमध्ये निर्माण होणारी रेती, खडी आणि रेडिमिक्स काँक्रीट वाळू रस्त्यावर पसरत असल्याचे एमआयडीसीच्या निदर्शनास आले. एमआयडीसीकडून रेती, खडी आणि रेडिमिक्स काँक्रीटची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतरही रस्त्यावरील मुख्य वळण आणि नागझरी व वाघोबा खिंडीतील वळणावरही वाहनांमधून गळती होत असल्याचे एमआयडीसीला आढळून आले. खडी आणि रेडिमिक्स काँक्रीटमुळे रस्ता निसरडा होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु माल वाहतूक करताना क्रशन आणि रेडिमिक्स प्लांट मालक पुरेशी काळजी घेत नसल्याचे निदर्शनास आल्याचे एमआयडीसीने पत्रात नमूद केले आहे.
वाहतुकीदरम्यान रस्त्यावर रेती, खडी, काँक्रीट, सिमेंटमिश्रित कृत्रिम वाळूची गळती होऊन रस्त्यावर पसरू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन एमआयडीसीकडून प्लांट मालकांना करण्यात आले आहे. तसेच गळती होत असलेल्या वाहनांवर परिवहन आणि वाहतूक पोलिस विभागामार्फत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

चिल्हार-बोईसर रस्त्यावर ठिकठिकाणी खडी आणि रेडिमिक्स काँक्रीट पडून रस्त्याचे नुकसान होत आहे. रस्ता निसरडा होऊन अपघात वाढले आहेत. क्रशर आणि आरएमसी प्लांट मालकांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. उपाययोजना केल्या नाही, तर कारवाई केली जाईल.
- मुकेश लांजेवार, उपअभियंता, औद्योगिक विकास महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com