१५ हजार पुस्तकांचे आदान - प्रदान

१५ हजार पुस्तकांचे आदान - प्रदान

सानिका वर्पे : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : हल्ली डिजिटल युगात हातात पुस्तक घेत वाचन करणे या मागची भावना, जो आनंद आहे, त्याचा विसर पडत आहे. त्यासाठी वाचनसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी अनेक संस्था, वाचनालये आजकाल पुढे सरसावत असल्याचे दिसून येते. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रम तसेच अनोख्या कल्पना राबवून प्रसार करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात व्यास क्रिएशनतर्फे पुस्तकांचे आदानप्रदान या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात तब्बल १५ हजार पुस्तकांची देवाणघेवाण झाली; तर या उपक्रमाला आतापर्यंत १,२०० ते १,३०० नागरिकांनी भेट दिली.

व्यास क्रिएशन आणि राज्ञी वेल्फेअर असोसिएशनतर्फे तीनदिवसीय पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागील सहा वर्षांपासून व्यास क्रिएशनतर्फे पुस्तक आदानप्रदान या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. संस्थेला १९ वर्षे झाल्याने १९ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत या संस्थेने ७५० पुस्तकांचे प्रकाशन केले आहे; तर यंदाच्या महोत्सवात पाच सत्रांपैकी चार सत्रात १२०० ते १३०० नागरिकांनी भेट दिली. या महोत्सवात मराठी, इंग्रजी, हिंदी पुस्तके आहेत.

पुस्तकांचे भरभरून दान
पुस्तके आदानप्रदान महोत्सवात तिन्ही भाषांमध्ये बालसाहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कवितासंग्रह, काल्पनिक विज्ञान अशी पुस्तके आहेत. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती. आपल्या वाचून झालेल्या पुस्तकांच्या बदल्यात नवे पुस्तक घेण्याचा आनंद यावेळी वाचनप्रेमी रसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या महोत्सवात नागरिकांनी दर्जेदार पुस्तकांचे भरभरून दान केले. वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच स्तुत्य आहेत. मागील पिढीकडून पुढच्या पिढीला वाचन संस्कृतीचा हा वारसा निश्चितच दिशादर्शक मार्गदर्शक ठरेल, यात काहीच शंका नाही, अशी प्रतिक्रिया वाचकांनी दिली.

फक्त पुस्तकांचे आदानप्रदान नाही, तर विचारांचेदेखील या ठिकाणी आदानप्रदान आहे. इथे साहित्यिक-लेखकांची मांदियाळी आहे. तसेच जिथे लेखकांची वाचकांची भेट होते, भेट तिथे भावना थेट पोहचतात. त्या भेटीगाठी झाल्या नाहीत, तर तुमच्या भावना पोहचू शकत नाही. लेखक फक्त लिहिणार आणि आपण फक्त वाचणारा असे नाही, तर लेखकांची त्यामागची भावना काय आहे, हे आपल्याला भेटल्यानंतर समजते. यासाठीच असे उपक्रम राबवले जात आहेत. या महोत्सवात येणाऱ्या सर्व वाचकांना पुस्तकांना स्पर्श करून पाहता येत आहेत. स्पर्शाने पुस्तके खुलतात, ती आपोआप बोलायला लागतात.
- वैशाली गायकवाड, संस्थापिका, राज्ञी वुलफेअर असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com