देशी वृक्षरोपांची लागवड

देशी वृक्षरोपांची लागवड

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : नागरीकरणाची कास धरत विकासाचा वेग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशी झाडांच्या कत्तली होत चालल्या आहेत. जंगले ओस पडत आहेत. देशी वनस्पती आणि प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या झाडांवरील जीव-जंतूंचे आयुर्मान धोक्यात आले असून नैसर्गिक चक्र कोलमडल्याने जैवविविधता संपण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीला आधार देण्यासाठी परदेशी झाडे लावण्यापेक्षा देशी झाडे लावून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने देशी वृक्षलागवडीवर भर दिला आहे. ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेने पाच हजारांपेक्षा जास्त देशी झाडांची लागवड केली आहे.
पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी पाच हजारांहून अधिक स्थानिक देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पालिकेने केलेल्या जाहीर आवाहनास अनुसरून १५० हून अधिक संस्था व व्यक्ती यांनी उद्यान विभागाशी संपर्क साधला. वृक्षरोपे तसेच वृक्षारोपणासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीनुसार साधारणत: १२ हजार देशी वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.

----------
विविध विभागांत केलेली लागवड
- नेरूळ विभागात नेरूळ पोलिस ठाण्यासमोरील मोकळ्या जागेत बांबूच्या ३७५ झाडांची लागवड केली.
- ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे २५०० बांबूची व २५० जांभूळ झाडांची लागवड करण्यात आली.
- बेलापूर पामबीच येथे २५० बांबूची लागवड करण्यात आली.
- तुर्भे-सानपाडा विभागात ६५ देशी प्रजातींची करंज, ताम्हण, बहोनिया, एलोस्निया, बेलपत्राची लागवड.
- तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी ५०० हून अधिक आकाशनिंब, पिंपळ, वड, गुलमोहर, आवळ्याची लागवड.
- कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात ५०० आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत.
- बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानात बकुळ, ताम्हणाची ४० झाडे.
- घणसोली येथील सेंट्रल पार्क येथे बकुळ, कडुनिंब, पिंपळ, अर्जुन, आंबा, पारिजातक, चाफा, टॅबोबिया, कांचन, करंज अशा विविध प्रकारच्या ६५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

----------------------
रस्त्याकडेला हरित पट्ट्यावर भर
पाम बीच रोड, घणसोली येथेही बकुळ, अर्जुन, कांचन, कडुनिंब, पारिजातक, टॅबोबिया अशा देशी झाडांची २५ वृक्षरोपे लावण्यात आली आहेत. ऐरोली सेक्टर १४ येथे पालिकेचे शाळा मैदान आणि पटनी रोड येथे साधारणत: ३७५ कडुनिंबाच्या झाडांची लागवड केली आहे. दिघा येथील साने गुरुजी उद्यानातही जांभूळ, ताम्हण, कडुनिंब, आकानिम व ‍निलगिरी अशा ६५ देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये यांनीही आपल्या स्तरावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व अनुषांगिक कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते.
---------------------
नवी मुंबई महापालिका उद्यान विभागातर्फे शहराच्या वृक्षसंवर्धनासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन करण्यात आले. प्रामुख्याने फळे-फुले देणाऱ्या व पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या आणि त्याद्वारे नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर घालणाऱ्या स्थानिक देशी प्रजातींच्या वृक्षांचीच लागवड करण्यात आली.
- दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com