नाट्य महोत्सवात झळकला हाऊसफुलचा बोर्ड!

नाट्य महोत्सवात झळकला हाऊसफुलचा बोर्ड!

नाट्य महोत्सवात झळकला हाऊसफुलचा बोर्ड!
‘सकाळ’च्या आयोजनाला उत्तुंग प्रतिसाद; मान्यवरांच्या उपस्थितीत आज समारोप

मुंबई, ता. ८ : सकाळ माध्यम समूहाच्या वतीने विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवाला दुसऱ्या दिवशी नाट्यरसिकांनी उत्तुंग प्रतिसाद दिला. ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ‘आज्जीबाई जोरात’ नाट्यकलाकृतींनी रसिकमने जिंकून घेतली. उद्या (ता. ९) महोत्सवाचा समारोप होणार असून, समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य आणि कलाप्रेमी अशी ओळख असलेले मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, रंगभूमीवरील चार दशकांच्या कारकिर्दीनिमित्त दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सकाळ माध्यम समूहाकडून मुंबईत ७ जूनपासून चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ‘चारचौघी’ने या महोत्सवात पहिले पुष्प गुंफल्यानंतर शनिवारी दुपारी ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ नाटकाद्वारे दुसरे; तर ‘आज्जीबाई जोरात’ या कलाकृतीने तिसरे पुष्प गुंफले. चौथे पुष्प उद्या प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ नाटकाद्वारे गुंफले जाणार आहे. विविध प्रकारच्या नाट्यकलाकृतींना कलात्मक दिग्दर्शनाचा साज चढवणारे प्रतिभावंत रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांचा सत्कारही या वेळी करण्यात येणार आहे. कुलकर्णी यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ या नाटकाच्या सादरीकरणाने झाली. मराठी रंगभूमीवर गाजलेल्या या कलाकृतीचे अलीकडेच परदेशातही अनेक प्रयोग झाले. तो दौरा आटोपल्यानंतर या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग या महोत्सवात सादर झाला. या नाटकात ज्येष्ठ रंगकर्मी रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांच्यासह निनाद लिमये, पार्थ केतकर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. या नाटकाला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा संगीतसाज, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि रवि रसिक यांची प्रकाशयोजना होती. आज (ता. ८) दुसऱ्या दिवशी स्वरा मोकाशी लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकाचे दुपारी सादरीकरण झाले. यात वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, दीप्ती लेले, राजन जोशी, अथर्व नाकती यांच्या अभिनयाने नाट्य रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनाही अंतर्मुख कारणारे ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने नाट्यगृहात धम्माल केली.


..
नाट्य कलावंतांचा सत्कार
चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्वरा मोकाशी लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकातील कलावंत वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर यांचा प्रायोजक ‘वामन हरी पेठे’च्या अंजली पेठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आयोजित करण्यात आलेल्या नाट्यमहोत्सवाबाबत सकाळ समूह आणि प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे मल्टिमीडिया संपादक अंकित काणे, मुंबई आवृत्तीचे व्यवस्थापक उमेश पिंगळे उपस्थित होते.
..
वाचकांसाठी विशेष सवलत
नाट्य महोत्सवासाठी ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचा अंक दाखवून प्रत्येक नाट्यरसिकाला तिकिटावर सवलत देण्यात येणार आहे. महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकाचे तिकीट १०० रुपयांत मिळणार आहे. ही सवलत पहिल्या १०० नाट्यरसिकांना मिळू शकेल. सवलतीच्या दरातील तिकिटे नाट्यगृहावर मिळणार आहेत.
---------------
‘सकाळ’सोबत भावनिक नाते : चंद्रकांत कुलकर्णी
माझे ‘सकाळ’सोबत केवळ भावनिकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक नातेही जुळलेले आहे. या नात्यातूनच मी ‘सकाळ’च्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी झालो आहे. महाविद्यालयीन पातळीवर झालेल्या ‘सकाळ करंडक’ स्पर्धेचा मी सहा वर्ष ब्रँड ॲम्बेसिडर होतो. गेल्या वर्षी ही स्पर्धा पुणे विभागापुरती होती, या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर दहा ठिकाणी होत आहे. त्याचाही मी या वेळी ब्रँड ॲम्बेसिडर आहे. ‘सकाळ’ कायम सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीशी संबंधित असतो. वेगवेगळ्या वयोगटातील वाचक, नाट्यप्रेमी आदींसाठी वाचन, वक्तृत्व, चित्रकला, नाट्य, एकांकिका अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा सकाळ आयोजित करत असतो. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांसोबत ‘सकाळ’ने आपली नाळ जोडून ठेवली असून तीच ‘सकाळ’ची भूमिका आहे.


..
सादर होणारे नाटक
रविवार, ९ जून
दुपारी : ४ वाजता
संज्या छाया
...................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com