आव्हाडांचे एक तीर तीन निशाण

आव्हाडांचे एक तीर तीन निशाण

हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे दोन खासदार निवडून आले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. मात्र, या सर्व रणसंग्रामात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही जिल्ह्यात आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा हट्टाने काँग्रेसकडून हिसकावल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला उमेदवार निवडून आणला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी धर्म पाळत मुख्यमंत्री पुत्राची लीड कमी करण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. तर ठाण्यात अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा त्यांनी जपल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाण्यात शिंदे-आव्हाड या विरोधी जोडीचा फॅक्टर कायम असून, दोघांचीही राजकीय खेळी पुन्हा एकदा सरस ठरली आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी पूर्वी या जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व होते. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी हे वर्चस्व मोडून काढले. भाजपला रोखण्यासाठी प्रसंगी त्यांनी त्या वेळचे त्यांचे राजकीय विरोधक असलेले वसंत डावखरे यांची मदत घेतल्याचे अनेक किस्से आहेत. शिवसेना व काँग्रेस पुढे राष्ट्रवादी अशी ही छुपी युती त्या वेळी ठाण्यात होती. ही परंपरा दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनीही कायम ठेवली. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्याभोवतीही राजकारण फिरत राहिले. खरेतर शिंदे आणि आव्हाड या जोडीभोवतीच ठाण्याचे राजकारण दिशा बदलत राहिले. एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असले तरी दोघांमध्ये मैत्रीचे नाते कायम राहिले.
आता शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या एका गटाचे एकनाथ शिंदे प्रमुख नेते झाले असून मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचे नेतृत्व करत आहेत. तर जितेंद्र आव्हाडही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. अशा वेळी आपली ताकद दावण्याची पहिली संधी ठाण्यातील या दोन प्रमुख नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे व कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघात शिंदे गट आणि ठाकरे गट अशी लढत झाली. दोन्ही गटाने प्रत्येकी दोन जागा जिल्ह्यात लढवल्या. तर दुसरीकडे भाजप आणि शरद पवार गट हे दोन पक्ष भिवंडीत आमनेसामने होते. चार प्रमुख पक्षांच्या लढतीत ठाकरे गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि भिवंडीत भाजप खासदार कपिल पाटील यांना घरी बसावे लागले. ठाकरे गटापेक्षा भाजपचा पराभव हा मोठा मानला जात आहे. या सर्व रणसंग्रामात मुख्यमंत्री शिंदे यांची कामगिरी सरस ठरली आणि ते या विजयाचे नायक ठरले. पण आव्हाड यांची भूमिकाही तितकीच छाप सोडणारी ठरली आहे.

दहा वर्षांनतर खासदार
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये २००९ मध्ये राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला होता. त्यानंतर २०१४ ला मोदी लाटेत ही जागा राष्ट्रवादीच्या हातची गेली. तेव्हापासून ठाणेच नव्हे तर जिल्ह्यातही राष्ट्रवादीसाठी दिल्लीची वाट बिकट झाली. आता बदलत्या राजकीय समीकरणात भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्याची यशस्वी खेळी आव्हाडांनी साधली. वास्तविक हा मतदारसंघ काँग्रेसचा; पण सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना शरद पवार गटात घेऊन त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. ही सर्व राजकीय खेळी आव्हाड यांनी खेळली. त्यामुळे भिवंडीत त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दरम्यान त्यांच्यावर अनेकांनी टिकेची झोड उठवली. पण, अखेर केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भाजपच्या कपिल पाटील यांच्या विजयाचा रथ त्यांनी उधळून लावला. दहा वर्षांनतर जिल्ह्यातून भिवंडीमार्गे दिल्लीची वाट त्यांनी मोकळी केली.

मुंब्रा-कळवाचा गड मजबूत
ठाणे महापालिका हद्द आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ हा आपला मजबूत गड असल्याचे आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिले. या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना सर्वाधिक मते मिळाली. या निवडणुकीत दरेकर यांचा पराजय झाला असला, तरी अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवून त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अपेक्षित रेकॉर्ड मोडण्याचे स्वप्न उधळून लावले. यासाठी आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघाची मोठी साथ मिळाली. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची तयारी करत असलेल्या महायुतीलाही त्यां‍नी आपली ताकद दाखवून दिली आहे.

ठाण्यात दुर्लक्ष
भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघात आव्हाड यांनी जितके लक्ष घातले, तितकेच ठाण्यात सोयीस्कर दुर्लक्ष केले, अशी राजकीय चर्चा आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला काँग्रेस व शरद पवार गटाचे जे सहकार्य अपेक्षित होते तितके मिळाले नाही. पण, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिष्ठा मात्र जपली गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com