महावितरण झोपेत; ग्राहकांचे जागरण

महावितरण झोपेत; ग्राहकांचे जागरण

वज्रेश्वरी, ता. १० (बातमीदार) : मॉन्सूनपूर्व कामांसह नियमित देखभाल, दुरुस्तीसाठी महावितरणकडून लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते; परंतु थोडाही वादळ, वारा, पाऊस आला की वीज गायब होत आहे. असा कोणताही दिवस नाही ज्या दिवशी वीज खंडित झाली नाही. शहरासह तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या ग्रामीण भागातील नागरिक महावितरणच्या या ढिसाळ कारभाराला वैतागले आहेत. याचा परिणाम शहराच्या व ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे.
काही दिवसांपासून दर अर्ध्या-एक तासाने भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोलीसह खेडे-पाड्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. आधीच उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्याने सर्वच त्रस्त झाले आहेत. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्राहक वैतागले आहेत. पावसाने हजेरी लावताच तब्बल तीन तास वीजपुरवठा नव्हता. त्यानंतरही वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. वीज नसल्याने येथील पाणीपुरवठाही नियमित होत नाही. वयोवृद्ध, चिमुकले, आजारी व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहेत. घरातील विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. या सर्व प्रकारांत महावितरणचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या मूलभूत प्रश्नांवर नेते, लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते कोणीही बोलले नसल्याचे दिसले. मागील वर्षी वादळात या परिसरात वाकलेले खांब, तारा गणेशपुरी कनिष्ठ उपअभियंता आदिनाथ टोंगे यांनी अजूनही दुरुस्त केल्या नाहीत. महावितरणच्या अशा ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. असेच राहिले तर भविष्यात या गावांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे, असे येथील नागरिक म्हणत आहेत.

वीज जाण्याची कारणे?
१) वीजवाहिनी तुटणे, रोहित्रातील बिघाड, वाहिन्या खराब होणे, उपकेंद्रातील बॅटरी नादुरुस्त, रोहित्रातील तेल संपणे.
२) पावसाचा शिडकावा सुरू होताच वीजपुरवठा खंडित केला जातो.
३) पीन इन्स्युलेटर, डिस्क इन्सुलेटर उन्हामुळे तापलेले असल्याने पावसाचे पाणी पडताच फुटण्याचा धोका असतो. खबरदारी म्हणून अशा वेळी महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात येतो.
४) वाऱ्यामुळे वीजवाहिनी तुटण्याचे प्रकार वाढले आहेत.
५) सबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असणे

पारोळ उपकेंद्रात वारंवार बिघाड
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्राला वसईवरून पारोळ उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. रस्त्यावरील अनेक गाव-पाडे या अंतर्गत येतात. या परिसरातही विजेचा लपंडाव सुरू आहे. याकडे संबधित अभियंत्याचे दुर्लक्ष असल्याने वीजपुरवठा सुरळीत नाही. यामुळे सर्वच भागांत हाल-बेहाल म्हणण्याची वेळ निर्माण झाली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार वाढत असताना स्थानिक वीज उपकेंद्रात वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत विचारणा केली असता, २२ केव्ही पारोळ उपकेंद्रावरून वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात येत असते. त्याचबरोबर जंपर तुटणे व ट्रान्सफार्मर खराब असल्यानेही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती दिली जाते. यामुळे उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत.

तक्रारी वाढल्या
अचानक विजेचा दाब वाढल्याने संबंधित फिडरवरील ग्राहकांना फटका बसतो. विद्युत उपकरणे खराब होत आहेत. दुपारच्या अन् रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा अचानक खंडित होऊन ग्राहकांची झोपमोड होते. दिवसभरात अधूनमधून वीजपुरवठा गायब होत असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत.

वीजग्राहकांकडून दररोज तक्रारी नोंदवल्या जातात. त्यात महावितरण विभागाचे संबंधित अधिकारी येथील कार्यालयात वेळवर येत नाही. त्यामुळे त्यांची इथून बदली करण्यात यावी.
- संदीप खिराडे, सरपंच, गणेशपुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com