भिवंडी पश्चिमेत भाजपला धोक्याची घंटा

भिवंडी पश्चिमेत भाजपला धोक्याची घंटा

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : भिवंडी लोकसभा मतदारसंघात १० वर्ष वर्चस्व असलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आणि कपिल पाटील यांची विजयाची
हॅट्‍ट्रीक चुकली. या मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहांपैकी पाच विधानसभा महायुतीच्या ताब्यात असूनही भाजपच्या उमेदवाराला येथे पराभवाची धूळ मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे भिवंडी पश्चिमची कामगिरी भाजपसाठी अत्यंत सुमार राहिली आहे. या मतदारसंघातून भाजपला सर्वांत कमी असे केवळ २५ हजार ६५५ इतके मतदान झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि भाजपचे आमदार महेश चौघुले यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. भिवंडी पश्चिम, मुरबाडमध्ये भाजपचे आमदार आहेत. शहापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार, तर भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिममध्ये शिंदे गटाचे आमदार आहे. भिवंडी पूर्वमध्ये सपाचा आमदार आहे. म्हणजे सहापैकी पाच विधानसभा या महायुतीच्या ताब्यात असून, दोन विधानसभा भाजपचे आमदार आहेत. असे असूनही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता भिवंडी पूर्वमधून पाटील यांना २७ हजार ३५२ मते पडली. भिवंडी ग्रामीणमध्ये ८० हजार ५४३, कल्याण पश्चिममध्ये ६३ हजार १८३, मुरबाडमध्ये ७५ हजार २३५, शहापूरमध्ये ३४ हजार ५१०; तर सर्वांत कमी भिवंडी पश्चिममधून २५ हजार ६५५ मते मिळाली आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी कळीचा विषय ठरला आहे.
१९९० पासून समाजवादी पक्षाचा गड राहिलेला भिवंडी विधानसभा मतदारसंघ २०१४ मध्ये भाजपच्या ताब्यात गेला. आजवर भिवंडी मतदारसंघात सपा आणि काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली, त्या वेळी भिवंडी विधानसभेचे पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे भाग झाले. १९९० नंतर एकदा शिवसेना सोडल्यास आजवर इथे वरचष्मा राहिला आहे तो सपा आणि नंतर काँग्रेसचा. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीच्या पारंपरिक जागा वाटपात शिवसेनेच्या ताब्यात होता. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि मोदी लाटेतही जागा भाजपने जिंकली. या ठिकाणाहून भाजपचे महेश चौगुले निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने आपापले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले होते. ज्यात भाजपचे महेश चौगुले विजयी झाले. २०१९ मध्येही त्यांनी आपल्या विजयाची घोडदौड सुरू ठेवली. पण २०२४ मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे स्थान डगमगण्याची शक्यता आहे.

मतदासंघाची रचना
भिवंडी पश्चिम मतदारसंघात भिवंडी शहरासह गावाचाही समावेश होतो. ज्यात ४० टक्के मतदार हा मुस्लिम आहे, तर उर्वरित हिंदू आहे. यात आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत भिवंडीतल्या निवडणुका या थेटपणे हिंदू-मुस्लिम अशाच झालेल्या आहेत. २०१४ आधीच्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव, काँग्रेसच्या नेतृत्वाप्रती स्थानिकांमध्ये असलेली नाराजी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लावलेला जोर, परप्रांतीयांची शिवसेनेप्रती असलेली नापसंती यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. पण, आता हीच गणिते फिरली आहेत. येथील मुस्लिम एकगठ्ठा मते भाजपच्या विरोधात गेली आहेत. येथील हिंदू मतदारही भाजपच्या कामगिरीवर खूश नसल्याचे दिसते. त्यामुळे येथे महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी पश्चिममध्ये परिवर्तन घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भिवंडी पूर्व, पश्चिमने मामांना तारले
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज केली असता भिवंडी पूर्व आणि पश्चिमने तारले आहे. या भिवंडी पूर्वमधून ८६ हजार ३२८, तर पश्चिममधून बाळ्या मामांना सर्वाधिक ८९ हजार ४९ मते मिळाली. तर भाजपचे पराभूत उमेदवार कपिल पाटील यांना भिवंडी ग्रामीण आणि त्याखालोखाल मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत.

विधानसभानिहाय मते
विधानसभा कपिल पाटील सुरेश म्हात्रे
भिवंडी पूर्व २७३५२ ८६३२८
भिवंडी ग्रा. ८०५४३ ७२७४४
कल्याण प. ६३१८३ ४३४८४
मुरबाड ७५२३५ ४८८६०
शहापूर ३४५१० ४४४१८
भिवंडी प. २५६५५ ८९०४९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com