मनोरमधील दुर्गम भाग अंधारात

मनोरमधील दुर्गम भाग अंधारात

मनोर, ता. १० (बातमीदार) : महावितरण कंपनीकडून मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे वेळेत केली नसल्याने पहिल्या पावसात ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. चार दिवसांपूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. तेव्हापासून मनोर परिसरातील ग्रामीण भागाला विजेअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान उपकेंद्र मंजूर असताना जागेअभावी त्याची उभारणी होत नसल्याने पावसाळ्यात ढेकाळे फिडरवरील महामार्गालगतच्या गावांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. राजकीय नेते आणि पदाधिकारी उपकेंद्राच्या निर्मितीसाठी पुढाकार घेत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेसपासून ढेकाळे ते दहिसरपर्यंतची २० गावे आणि १०० पाड्यांना सावरखंड उपकेंद्रांतर्गतच्या ढेकाळे फिडरमार्फत वीजपुरवठा केला जातो. सावरे-एम्बुर, पाचूधारा, बहिरीफोंडा आणि जायशेतसारख्या दुर्गम भागाला वीजपुरवठा ढेकाळे फिडरवरून केला जात आहे. पालघर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्यापासून महामार्गावरील ढेकाळे फिडरवरील वीजपुरवठा अनियमित झाला आहे. चार दिवसांपासून सावरे-एम्बुर आणि पाचूधारा भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील काटेला पाड्यात वीजवाहिनी तुटल्याने बैलाला विजेचा धक्का बसला; परंतु ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून त्याचा जीव वाचवला. त्यानंतर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तुटलेल्या वीजवाहिनीचा पुरवठा खंडित केला. दोन दिवस पूर्ण झाल्यानंतरही काटेला पाड्याची वीजवाहिनी दुरुस्त करण्यात आली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. वीज खंडित झाल्याने शेतीची अनेक कामेही खोळंबली आहेत. दरम्यान, नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दावे फोल
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व कामांसाठी महावितरण कंपनीकडून मोठा ब्रेकडाऊन घेतला जातो. दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करून पावसाळ्यात वीजपुरवठा नियमित उपलब्ध करून दिला जाणार असल्याची आश्वासने दिली जातात. परंतु यंदा पहिल्या पावसातच महावितरणच्या कामांचे दावे फोल ठरले आहेत.

का करतात वीजपुरवठा खंडित
ढेकाळे फिडरवरील गावांना होत असलेला वीजपुरवठा पावसाळ्यात सर्वाधिक वेळा प्रभावित होत असतो. फिडरवरील वीजवाहिन्या ५० ते ६० किलोमीटर लांबीच्या आहेत. आठ ते दहा टॅबलाईन असल्याने एका लाइनवर बिघाड झाल्यानंतर संपूर्ण फिडरवरील वीजपुरवठा खंडित होतो. बिघाड झालेल्या ठिकाणाचा शोध घेऊन दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जातो. दोन वर्षांपूर्वी वैतरणा नदीला आलेल्या पुरात वीजवाहिन्या आणि खांब वाहून गेल्याने ढेकाळे फिडर वरील शेवटच्या टोकावर असलेल्या गुंदावे, दहिसर, साखरे आणि नावझे या गावांना दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. तर सावरे एम्बुर भागाला १२ ते १३ दिवसांनी वीजपुरवठा पूर्ववत केला होता.


पहिल्या पावसाने महावितरणचे दाणादाण उडवली आहे. चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. जनरेटर वापरून पिकांना पाणीपुरवठा आणि अन्य कामे करावी लागत आहेत. सावरे-एम्बुरसारख्या दुर्गम भागावर महावितरण कंपनीकडून कायम दुर्लक्ष केले जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात किमान वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा आहे.
- सुदर्शन वनगा, सरपंच, सावरे-एम्बुर ग्रामपंचायत

ढेकाळे फिडरवरील विजेची समस्या सोडवण्यासाठी लवकरच आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत महावितरण कंपनीच्या कार्यालयात शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे.
- विष्णू कडव, जिल्हा परिषद सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com