पावसाचा फटका भाज्यांना

पावसाचा फटका भाज्यांना

भाजीपाल्‍याच्या घाऊक दरात वाढ
एपीएमसीत आवक घटली; वाहतूक खर्च निघत नसल्‍याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे


वाशी, ता. १० (वार्ताहर) ः राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. एमपीएमसीतील आवक कमी झाल्याने घाऊक दर जवळपास ४० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. अवकाळीचा फटका, त्‍यात वाहतूक खर्चही निघत नसल्‍याने एमपीएमसीत भाजीपाला पाठवणे परवडत नसल्‍याचे काही शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे. किरकोळ बाजारातही भाज्‍यांचे दर दुप्पटीने वाढल्‍याने गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे.

नवी मुंबईतील एपीएमसीत दरदिवशी भाजीपाल्‍याच्या ६०० ते ६५० गाड्या येतात. सोमवारी भाज्यांच्या एकूण ५२२ गाड्यांची आवक झाली. ज्यामध्ये केवळ ३२ मोठ्या वाहनांचा समावेश आहे. भाज्यांचे कमी उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी एपीएमसीत भाजीपाला पाठवण्याऐवजी थेट ग्राहकांना विकण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचसोबत भाजी काढण्यासाठी लागणारी मजुरी आणि इतर खर्च पाहता हाती काहीच येत नसल्‍याने बाजारात गेल्‍या महिन्याच्या तुलनेत भाज्यांची आवक तुलनेने कमी होत असल्‍याने दरात ३० ते ४० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी १५ ते २० रुपये किलोने मिळणारी वांगी आता २४ ते ३५ रुपये किलोने विकली जात आहे. तर २० ते ४५ रुपये किलोने मिळणारी भेंडी आता ४५ ते ५० रुपयांना मिळत आहे. गवार ६० रुपयांना तर पडवळ ४० ते ५० रुपये किलोने मिळत आहे.

दरात वाढ प्रतिकिलो रुपयांत

भाज्या दोन आठवड्यांपूर्वी आता

कोबी ७-१०, ८-१२
फ्लॉवर १०-२२, १६-२२
पडवळ ४०-५०, ४४-५४
टोमॅटो ७ -२२, ३०-३४
पालक ८-१०जुडी, १०-१२

सध्या काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे तर काही ठिकाणी उकाडा आहे. अशा वातावरणाचा भाजीपाल्‍याच्या उत्‍पादनावर परिणाम होत असल्‍याचे व्यापारी सांगतात. मोठ्या वाहनांतून भाजीपाल्‍याची वाहतूक करणेही परवडत नसल्‍याने काही शेतकरी लहान वाहनांतून एकत्रित भाज्‍या आणतात. पुढील काही दिवस भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

बदलते हवामान आणि अवकळीचा फटका भाज्यांना बसल्याने बाजारात आवक घटली आहे. भाज्यांचा नवीन हंगाम सुरू होण्यासाठी पावसाळ्याची वाट पाहावी लागेल. तोपर्यंत दर तेजीतच राहतील, असा अंदाज आहे.
- रामचरण कहार, भाजी विक्रेते, एपीएमसी

बाजारात भाज्यांचे दर वाढले असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच उत्पन्न कमी, त्यात कापणी आणि वाहतुकीचा खर्च पाहता शेतकऱ्यांना भाज्यांची अगदी कवडी मोल किंमत मिळत आहे.
- उल्हास पाटील, भाजी उत्पादक शेतकरी, नाशिक

भाज्‍यांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. आम्ही काटकसर करून घरखर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे बजेट कोलमडले आहे.
- प्रिया पाटील, गृहिणी, कोपरखैरणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com