डोंबिवलीत स्वच्छता मुकादमाला मारहाण

डोंबिवलीत स्वच्छता मुकादमाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सफाई मुकादमाला रहिवाशाने स्वच्छतेच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कामगाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

प्रदेश पांडुरंग देसाईकर हे महापालिकेच्या ह प्रभाग परिसरात काम करतात. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव भागातील प्रभाग क्रमांक ५३ मध्ये स्वच्छता मुकादम म्हणून ते कार्यरत आहेत. विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, प्रदेश हे मोठागाव परिसरात गुरुवारी (ता. ६) सकाळच्या वेळेत सफाई कामगारांकडून स्वच्छतेचे काम करून घेत होते. रस्त्यावर स्वच्छतेचे काम सुरू असताना येथील रहिवासी माणिक भोईर यांची कार आणि दुचाकी उभी होती. या वाहनांखालील कचरा काढून तो साफ करण्यासाठी माणिक यांनी प्रदेश यांना सांगितले. त्यांनी सफाई कामगारांना बोलावून कचरा साफ करून घेतो, असे माणिक यांना सांगितले. या गोष्टीचा माणिक यांना राग आला. त्यांनी आपण सांगूनही कचरा का साफ केला जात नाही, असा प्रश्न प्रदेश यांना केला. त्यानंतर त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वाहनांवर कारवाईची मागणी
कल्याण, डोंबिवली शहरात धनदांंडग्यांची वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यांच्याखालील सफाई पालिका कर्मचाऱ्यांनी दररोज करावी, अशी अपेक्षा ठेवून ते पालिका सफाई कामगारांंना नेहमीच दमदाटी करतात. मुळात रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई असताना नियमांचे उल्लंघन करत अनेक वाहने रस्त्यावर उभी असतात. अशा वाहनधारकांवर पालिकेने वाहतूक विभागाच्या साह्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com