पनवेल

पनवेल

मॉन्सूनपूर्व कामांची पोलखोल
पनवेलमध्ये नालेसफाईची कामे अपूर्ण, रस्‍त्‍यावरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात अपघातांचा धोका

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १० ः पावसाळापूर्व कामांसाठी पनवेल महापालिका आयुक्‍तांनी बैठका घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नालेसफाई, रस्‍त्‍याची कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्‍या होत्‍या. मात्र अद्याप ही कामे अपूर्ण आहेत, रविवारी पडलेल्‍या पावसात महापालिकेच्या नियोजनाची पोलखोल झाली. शहरातील अनेक भागांत पावसाळी नाल्यांची साफसफाई अपूर्ण आहे. नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर परिसरात रस्ते काँक्रिटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. अनेक ठिकाणी साफसफाईसाठी काढण्यात आलेली गटारांवरील झाकणे अद्याप बसवलेली नाहीत. तर काही भागात रस्‍त्‍यापेक्षा गटारे एक-दीड फूट उंच झाल्‍याने पावसाचे पाणी जाणार कसे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.
पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये सिडको वसाहतींचा समावेश आहे. दरवर्षी या ठिकाणी पावसाचे पाणी साचून परिसर जलमय होतो. कळंबोली वसाहत सखल भागात असल्याने थोडा पाऊस झाला तरी पाणी भरते. २६ जुलै २००५ ला वसाहतीची मोठी वाताहत झाली होती. मनुष्य आणि जीवितहानी आजही कळंबोलीकर विसरलेले नाहीत. त्यानंतर सिडकोने पावसाळी नाले काढले. त्याचबरोबर गटारांची साफसफाई सुरू केली. मात्र प्राधिकरणाकडून निकृष्‍ट दर्जाची कामे होत असल्‍याने कळंबोली परिसर जलमय होतो. आता या वसाहती पनवेल महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्‍या असून सिडकोपेक्षा चांगल्या दर्जाचे काम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आधी आयुक्त बदलले, त्यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्‍याने मॉन्सूनपूर्व कामांना उशिरा सुरुवात झाली. नियोजनाअभावी मुदत संपल्‍यावरही कामे अपूर्ण असल्‍याचे दिसून येत आहे.
मेअखेरपर्यंत शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण होणे आवश्यक होते. आता पावसाला सुरुवात झाली तरी बहुतांश रस्‍त्‍यांची कामे, नालेसफाईची कामे बाकी आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते बुजवण्याची तसदीही महापालिकेने घेतले नाही. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये वाहने आपटून अपघात होण्याची शक्यता आहे.
शहरातील मुख्य नाल्‍यांची साफसफाईची अद्याप न झाल्‍याने अतिवृष्‍टीत वसाहतींमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्याचे नियोजन फक्त कागदावरच आहे. पट्टीचे पोहणारे, याशिवाय होड्या, आणि हेल्पलाइन क्रमांक महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. कोणत्या अधिकाऱ्याकडे काय जबाबदारी देण्यात आलेले आहे, यासंदर्भातही नागरिकांना माहिती देण्यात आलेली नाही.

कळंबोली, खारघर खोदले
कळंबोली आणि खारघर या ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यालगतचे पावसाळी गटारे खुले आहेत. त्या ठिकाणी नव्याने गटारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. कळंबोलीआधीच समुद्रसपाटीपासून खाली आहे. गटारांचे काम अपूर्ण असल्याने, पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोदकाम केल्याने पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होईलच त्याचबरोबर रहदारीसाठीही अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

जलधारण तलावामध्ये गाळ
सिडको वसाहतीतील जे जलधारण तलाव आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. २६ जुलै २००५ च्या महापुरामध्ये वाहनांबरोबरच अनेक वस्तू त्याचबरोबर माती त्यामध्ये जाऊन बसली आहे. त्यामुळे येथील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. पनवेल महापालिकेने फक्त गाळ काढण्याची घोषणा केली, प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला धोका निर्माण झाला आहे.

विमानतळाच्या भरावामुळे पुराचा धोका
पनवेलच्या बाजूला असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आठ मीटर उंचीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच पनवेलसह सिडको कॉलनीतील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचणी येणार आहेत. या अगोदर अशा प्रकारे पाणी साचून जनजीवन विस्कळित झाले होते. या संदर्भातही महापालिकेने

पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही. त्याचबरोबर सिडकोचेही दुर्लक्ष होत आहे.

नादुरुस्त पम्‍पिंग स्टेशन
कळंबोली आणि नवीन पनवेल या ठिकाणी पंपाद्वारे पावसाचे पाणी बाहेर काढावे लागते. विशेष करून कळंबोलीमध्ये पम्‍पिंग केल्याशिवाय पाणी कमी होत नाही. मात्र येथील पम्‍पिंग हाऊस जुनाट झाले आहेत. पंप बंदावस्‍थेत असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात.

पावसाचे पाणी साचण्याचे ठिकाण!
पनवेल शहर ः सहस्रबुद्धे रुग्‍णालय, बावन बंगला, ठाणे नाका, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी, कोळीवाडा, पटेल मोहल्ला, पायोनियर सोसायटी

नवीन पनवेल ः अभुदय बँक, बांठिया विद्यालय, फायर ब्रिगेड, सिडको कार्यालय, चौक

खांदा कॉलनी ः शिवाजी चौक, सिग्नल, शनी मंदिर, महात्मा शाळा सेक्टर ८, रिक्षा थांबा

कळंबोली ः सेंट जोसेफ शाळा ते साईनगर सोसायटी, आयडीबीआय बँक चौक ते मांगलेश्वरी मंदिर, कार्मेल स्कूल ते गुरुद्वारा चौक, सेक्टर १० राजकमल सोसायटी ते महावितरण कार्यालय-कळंबोली, फायर ब्रिगेड ते करावली चौक परिसर, सेंट जोसेफ शाळा ते होल्डिंग पाँड, अयप्पा मंदिर ते टपाल कार्यालय, एलजी, ई-वन, लोखंड पोलाद बाजार


...........

विजेच्या कडकडाटापासून सावधान

तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना

पनवेल, ता. १० (बातमीदार) ः पावसाळ्‌यात वीज पडल्‍याने नुकसाची घटना अनेकदा घडल्‍या आहेत. अशा वेळी विजेपासून संरक्षणासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पनवेल तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.
शेतात, मोकळे मैदान, झाडे किंवा उंच स्तंभाजवळ जाऊ नका, कारण त्‍या ठिकाणी विजेच्या झटक्याची सर्वाधिक शक्यता आहे. वीज चमकताना घराबाहेर असल्‍यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वीज चमकत असताना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणे टाळावे, कारण उंच झाडे स्वतःला विजेकडे आकर्षित करतात. कार्यालये, दुकानांची दारे-खिडक्या बंद कराव्यात, गाडीत असाल तर काचा बंद कराव्यात, धातूच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहावे, धरणे, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहावे. टेलिफोन किंवा वीजेच्या खांबाखाली थांबू नये, वीज चमकत असताना मोबाईलचा वापर टाळावा, अशा सूचना आपत्ती व्यवस्‍थापन कक्षाकडून देण्यात आल्‍या आहेत.

वीज पडल्यानंतर काय करायच
बाधित व्यक्तीचा श्वास, हृदयाचे ठोके सुरू आहे ना हे तपासून पाहावे. जर व्यक्तीचा श्वासोच्छ्वास थांबला असेल, तर कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डियाक कॉम्प्रेशनचा वापर करावा. अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांना इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाहावे आणि लवकरात लवकर दवाखान्यात न्यावे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी पनवेलमधील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात पनवेलमध्ये सरासरी दरवर्षी २ हजार ८२४ मिलिमीटर पाऊस पडतो. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्‍या सूचनांचे पालन करावे.
- विजय पाटील, तहसीलदार, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com