कोस्टल रोड प्रकल्पातील दुसरा मोठा बोगदा सुरू

कोस्टल रोड प्रकल्पातील दुसरा मोठा बोगदा सुरू

‘कोस्टल’मधील दुसरा मोठा बोगदा सुरू
मरिन ड्राईव्हहून वरळीपर्यंतचा प्रवास ९ मिनिटांत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा मोठा बोगदा सोमवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे मरिन ड्राईव्हहून वरळीपर्यंतचा ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या आठ ते नऊ मिनिटांत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पाहणीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे पाच दिवस सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे; तर कोस्टल रोडचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवारी व रविवारी हा मार्ग बंद ठेवला जाणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरिन ड्राईव्ह हा ९ किमीचा बोगदा १२ मार्च रोजी सुरू करण्यात आला आहे. आता मरिन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. मुंबईची वाहतूक वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिंन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. कोस्टल रोडच्या कामात मुंबईचे वैभव असणाऱ्या ‘राणीच्या हारा’ला कोणताही धक्का लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी रस्त्याच्या बांधकामात २.०७२ किमीचे दोन महाकाय बोगदे जमिनीखाली ७० मीटर खाली खोदण्यात आले आहेत. दरम्यान, हा नवा बोगदा सेवेत आल्यामुळे अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने, तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल. उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी पुढील टप्प्यात बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता १० जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन पालिकेचे आहे. या नियोजनाप्रमाणे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पावर सुमारे १४ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

मरिन ड्राईव्ह ते वांद्रे १२ मिनिटांत शक्य
कोस्टल रोड प्रकल्पातील कामे टप्प्या-टप्प्याने पूर्ण केली जात आहेत. १०.५८ किमीचा कोस्टल रोड आणि ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडणारे दोन्ही महाकाय गर्डर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच वांद्र्याहून-दक्षिण मुंबई असा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या बारा मिनिटांत करता येणे शक्य आहे. या प्रकल्पामुळे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

...
‘मावळा’ची कामगिरी
हॅगिंग गार्डन येथून सुरू होणारा बोगदा ७० मीटर जमिनीखाली आहे, तर पुढे हा २० मीटर जमिनीखाली आहे. ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे बोगदे खोदण्यात आले आहेत. १० जानेवारी २०२२ रोजी यातील पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे; तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ मध्ये सुरू झाले आणि दुसऱ्या बोगद्याचे काम ३० मे २०२३ रोजी पूर्ण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com