पावसामुळे मुंबईत विजेच्या मागणीत घट

पावसामुळे मुंबईत विजेच्या मागणीत घट

पावसामुळे मुंबईत विजेच्या मागणीत घट


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : चढलेला तापमानाचा पारा आणि वाढलेल्या उकाड्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून विक्रमी पातळीवर गेलेली मुंबईची विजेची मागणी एकच दिवस झालेल्या पावसामुळे घसरली. रविवारी (ता. ९) दुपारपासून रात्रभर झालेल्या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे. त्यामुळे सोमवारी विजेच्या मागणीत तब्बल ७०० मेगावाॅटची घट होऊन ती साडेतीन हजार मेगावाॅटपर्यंत खाली आली. पुढील काही दिवसांत ही मागणी तीन हजार मेगावाॅटच्या खाली येण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात टाटा, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्टचे सुमारे ४७ लाख वीज ग्राहक आहेत. एरवी मुंबईची २५०० ते ३००० मेगावाॅटच्या घरात असलेल्या विजेच्या मागणीत सातत्याने वाढ नोंदवली जात होती. उकाड्यामुळे मुंबईकरांनी एसी, पंखे, कुलरचा वापर वाढवल्याने मार्चपासून मुंबईची विजेची दैनंदिन मागणी सातत्याने ३६०० मेगावाॅटहून अधिक राहिली आहे, तर २१ मे रोजी सर्वाधिक ४,३०७ मेगावाॅट एवढी विक्रमी मागणी नोंदवली गेली, तर ३१ मे रोजी ४,१४५ मेगावाॅट एवढी नोंद झाली. तसेच सातत्याने चार हजार मेगावाॅटच्या घरात मागणी नोंदली जात होती, मात्र रविवारपासून मुंबईत पावसाची एन्ट्री झाल्याने विजेची मागणी ३५०० मेगावाॅटपर्यंत खाली आली आहे. तसेच पावसाचा जसा जोर वाढेल, तसा एसी, कुलर, पंख्यांचा वापर कमी होणार असल्याने विजेची दैनंदिन मागणी आणखी कमी होऊ शकणार आहे.


..वीज कंपन्यांचे हुश्श...
मुंबईसह महाराष्ट्रातील विजेच्या मागणीचा गेल्या तीन महिन्यांतील वाढता आलेख पाहता वीजनिर्मिती केंद्र, उच्चदाब वीजवाहिन्यांवर मोठा ताण येत होता. तसेच मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्‍या वीज वाहिन्याही अतिभारित होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची भीती होती. तसेच वाढत्या मागणीमुळे राज्य भार प्रेषण केंद्राला (एसएलडीसी) वीजनिर्मिती आणि मागणी यांचा ताळमेळ घालून ग्रीडची स्थिरता राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, मात्र मुंबईत पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्याने सर्वच वीज कंपन्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com