farm rain.jpg
farm rain.jpg

रायगड

बोगस भात बियाणे विक्री केंद्रावर कारवाई
रोह्यात शेतकऱ्यांच्या आक्रमक भुमिकेनंतर कृषी विभाग सतर्क
रोहा, ता. ११ (बातमीदार) ः शहरातील श्री सद्गुरू कृपा कृषी केंद्र या भात खरेदी केंद्रात बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१०) हल्लाबोल करीत कारवाईची मागणी केली होती. त्‍यानुसार मंगळवारी तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांच्या आदेशानुसार, संबंधित भात विक्री केंद्रावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
शहरातील श्री सद्गुरू कृपा कृषी केंद्रात विविध जातीचे भात बियाणे विक्रीसाठी आणले होते. अकोला जिल्ह्यातील महाबीज भवन कृष्णानगर येथील महाराष्ट्र शासन सिड्स कॉर्पोरेशन लिमिटेड या एजन्सीकडून तीन लाख ४२ हजार रुपये किमतीचा ५७ क्विंटल वजनाचा जया जातीचा भात असे प्रत्येकी २५ किलो वजनाच्या २४० बॅग खरेदी करून रोह्यात विक्रीसाठी आणल्या गेल्या.
पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या केंद्रावरून भाताची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मात्र प्रत्यक्षात भाताच्या गोणीत जया जातीचा खराब भात आढळून आला. भाताच्या गोणीत माती व दगडाचे खडे, काळी कचरी, पळींज व तांदूळ असे खराब घटक आढळले. भाताच्या गोणी खरेदी केल्यानंतर पिंगळसई गावातील किसन देशमुख, भगवान शंकर देशमुख, जनार्दन दाजीबा देशमुख, जयवंत रामराव देशमुख, नंदकुमार भालेकर, सहादेव खेडेकर या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून बियाणे बोगस असल्याचे लक्षात येताच शेतकर्‌यांमधून संताप व्यक्त होत आहे. सरकारने नेमलेल्या एजन्सीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्‍याचे समजताच शेतकऱ्यांनी घडलेला सर्व प्रकार माजी सरपंच अनंता देशमुख यांना सांगितला. देशमुख यांनी सहकार्यासमवेत कृषी केंद्रात जाऊन श्री सद्गुरू कृपा कृषी केंद्र संचालक पी. जी. सुरणकर यांना धारेवर धरले. तसेच शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी केली.
दरम्यान मंगळवारी सकाळी तालुका कृषी कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार, मंडळ कृषी अधिकारी अमोल सुतार, कृषी सहायक प्रकाश राक्षिकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आतापर्यंत जया जातीचा आणलेला भात व विक्री केलेला भात, खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची नावे घेऊन चौकशीसाठी भाताचे काही नमुने ताब्यात घेतले आहेत.

जया जातीचे बोगस बियाणे रोह्यातील केंद्रावर विक्रीसाठी आले असून या बाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. ज्‍या केंद्रातून हे बियाणे विकले गेले आहे, त्‍या केंद्रातून चौकशीसाठी नमुने ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- महादेव करे, रोहा तालुका कृषी अधिकारी

रोहा : भात बियाणे खरेदी केंद्रातून तपासणीसाठी नमुने घेण्यात आले.

----------

हलक्‍या सरींतच महामार्ग चिखलमय
कोलाड नाक्यावर साचले पाणी; खड्डेमय रस्‍त्‍यामुळे चालकांची कसरत

रोहा, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड-आंबेवाडी नाक्यावर उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असून ठिकठिकाणी मातीचे ढिगारे पडले आहेत. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्‍याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. चिखलमय रस्त्यावरून प्रवास करताना छोटी वाहने, रिक्षा, दुचाकी तसेच पादचाऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागते.
पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी तुंबल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जवळपास १४ वर्षांपासून सुरू आहे. भूसंपादनाच्या वेळी अनेकांची दुकाने, गाळे, हॉटेलवर बुलडोझर फिरवण्यात आला. मात्र तब्बल बारा ते तेरा वर्षे उलटूनही काम अपूर्णच आहे.
ऐन पावसाळ्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्‍या सेवा रस्‍ता खड्डेमय झाला आहे.पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्याने चिखलयुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. सेवा रस्‍ता अनेक ठिकाणी पूर्णपणे उखडला आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर निखळल्‍याने खड्डे आणि चिखलात दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. लवकरात लवकर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पावसाच्या हलक्‍या सरींतच कोलाड-आंबेवाडी नाक्याची दुर्दशा झाली आहे, तर मुसळधार पावसात काय स्‍थिती होईल, असा प्रश्‍न नागरिकांसह चालकांकडून विचारण्यात येत आहे. सेवा रस्‍ता जागो जागी खचल्याने एसटी नक्की कुठे थांबते, हेच कळत नसल्‍याने प्रवाशांची धावपळ होते. कोलाड- खांबदरम्‍यान धावणाऱ्या रिक्षांनाही थांबा नसल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत असल्‍याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्‍यामभाऊ लोखंडे यांनी सांगितले.

रोहा ः पावसामुळे कोलाड येथील मुंबई - गोवा महामार्ग चिखलमय झाला.

---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com