घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला एक महिना

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला एक महिना

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला एक महिना
अनेकांचे संसार उद्‌ध्वस्‍त; जगण्याचा प्रश्नही ऐरणीवर
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः घाटकोपर येथे पोलिस वसाहतीतील पेट्रोलपंपावर होर्डिंग पडून १७ लोकांचा मृत्यू झाला. तर ५८ जण जखमी झाले. उद्या गुरुवारी (ता. १३) या घटनेला महिना पूर्ण होत आहे. यातील काही रुग्णांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांचे संसार अजूनही जागेवर आले नाहीत. तर रोजीरोटीचे साधन गमावल्यामुळे अनेकांसमोर जगण्याचे प्रश्न उभे राहिले आहेत.
घाटकोपर येथील पंतनगरमध्ये पोलिस ग्राऊंड पेट्रोलपंपाचे होर्डिंग मुसधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळून मोठी दुर्घटना झाली. कर्मचारी व पेट्रोल भरण्यास आलेली वाहने, वाहनचालक, पावसामुळे आडोशाला उभ्‍या असलेल्‍या माणसांवर हे महाकाय होर्डिंग पडले. त्यामध्ये दबून १७ निष्पाप लोकांना आपला प्राण गमावावा लागला. तर ५७ लोक यामध्ये जखमी झाले. अनेकांवर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर अजूनही काही जण रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
या घटनेत बहुतांश ऑटो, टॅक्सीचालक जखमी झाले. हाता- पायाला मोठा मार लागल्यामुळे अनेक जणांना अजूनही पायावर नीट चालता येत नाही. त्यामुळे अनेकांपुढे घर चालवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत मिळाली. मात्र, जिवंत आहेत त्‍यांचे काय, असा सवाल या घटनेतील जखमी विचारत आहे. महिना उलटूनही प्रशासनाने दिलेली आश्वासने हवेत विरल्याचा अनुभव जखमींना आला आहे.
चेंबूरमध्ये राहणारा २३ वर्षांचा वैभव पिळणकर आपला मित्र अजय शेलारसोबत मुलुंडला जात होता. पेट्रोल भरायला पेट्रोलपंपावर गेला असता त्‍या दोघांवर होर्डिंग कोसळले. वैभवच्या खांद्याला, छातीला आणि पायाला जबर मार लागला. मित्र अजय शेलार या अपघातात जखमी आहे. अजयने ग्राफिक डिझाईनरचा कोर्स केला असून त्या दिवशी नाेकरीच्या मुलाखतीसाठी तो निघाला होता. त्‍याच्या गुडघ्याचे दोन तुकडे झाले, पाठीच्या मणक्याला जबर मार लागला. आता नीट उठता-बसता येत नाही. राजावाडी रुग्णालयातून केईएममध्ये उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. आता नोकरी गेली, घरात कुणी कमावते नाही. शासकीय मदत मिळाली नाही. अजूनही या घटनेची आठवण झाली तर अंगावर काटा उभा राहतो, असे शेलार याने सांगितले. वैभव कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मदत मिळणार म्हणून कागदपत्रे घेऊन गेलो होतो. मात्र, मदत मिळाली नाही. मदतीबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळतात, असे त्याने सांगितले.
पंतनगरमध्ये राहणारे गोविंद कुमार सरोज हे रेशन दुकानात काम करतात. त्या दिवशी ते पेट्रोल भरायला आले होते. त्‍यांच्या पायाला जबर मार लागला. २५ वर्षे वय असलेल्या गोविंद यांच्या घरात वृद्ध आई-वडील आहेत. सर्व कुटुंबाचा गाडा गोविंद हाकतात. मदत देण्याचे आश्वासन अनेकांनी दिले. मात्र, काहीच झाले नाही. लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासनाचा कुठलाही अधिकारी फिरकलादेखील नाही. आता अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे गोविंद यांनी सांगितले. गोविंद यांच्यावर गुडघ्याची शस्‍त्रक्रिया होणार असून रुग्णालयात मला पाहायला कुणीच नसल्याचे त्यांनी सांगितले.

तोंडाला, पायाला मार लागला होता. दात पडले आहेत. दुसऱ्याच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करत होतो. गाडीची नुकसानभरपाई मिळाली नाही, कुणीही मदत करायला पुढे आले नाही. तीन आठवडे रुग्णालयात उपचार घेतला. आता उत्तर प्रदेशातील गावी आलो आहे.
-शकील खान, जखमी

टॅक्सीचालक असलेले सुभेदार मौर्या हे दिवा येथे राहतात. मुलुंडकडे आल्यावर ते घाटकोपरच्या पेट्रोलपंपावर सीएनजी भरण्यासाठी आले होते. अचानक होर्डिंग अंगावर कोसळले. पाठीचा मणका, छाती, मानेला जबर दुखापत झाली. चार दिवसांपूर्वी त्यांना राजावाडी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्‍यांना एक वर्ष गाडी चालवता येणार नाही, त्यामुळे खायचे काय, असा प्रश्न आहे.


पाठ, मान, डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. टॅक्सीचे पूर्ण नुकसान झाले आहे. घरात कमावता एकटाच होतो. अजून मला मदत करण्यात आलेली नाही की टॅक्सीची झालेली नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे घर कसे चालेल, याची चिंता पडली आहे.
-शेख असगर अली, जखमी टॅक्सीचालक

पायाला जबरदस्त मार लागला. दहा दिवसांपूर्वी ऑपरेशन करण्यात आले आहे. सहा महिने घरात राहावे लागणार आहे. दोन- तीन महिने पायाला प्लास्टर असणार आहे. बँकवाले घरात येऊन त्रास देतात. कमीत कमी संबंधित दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, तर मनाला शांतता मिळेल.
-इसार खान, जखमी वाहनचालक

होर्डिंगला परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. खूप मोठे नुकसान झाले आहे. घरात कमावता एकटा आहे. अद्याप मदत झालेली नाही. या घटनेची आठवण झाली की भीती वाटते. पुन्हा त्या जागेवर जाऊ नये, असे वाटते. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो आहे.
-नसीम खान, रिक्षाचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com