कोस्टल रोडवर अठरा हजार वाहनांचा प्रवास

कोस्टल रोडवर अठरा हजार वाहनांचा प्रवास

कोस्टल रोडवर अठरा हजार वाहनांचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल अठरा हजार वाहनांनी प्रवास केला. कोस्टल रोडमुळे वेगवान व आरामदायी प्रवास, तसेच ७० टक्के वेळेची व ३४ टक्के इंधनाची बचत होत आहे.

मुंबईचा प्रवास वेगवान करणारा कोस्टल रोड मुंबई महापालिकेचा महत्त्वांकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सीलिंक असा १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. या मार्गात २.०७२ किमीचे दोन महाकाय बोगदे समुद्राखालून गेले आहेत. यातील एका बोगद्यातून १२ मार्चपासून वरळी ते मरिन ड्राइव्ह असा प्रवास सुरू झाला आहे तर दुसऱ्या बोगद्यातून मंगळवारी (ता. ११) सकाळपासूनच प्रवास सुरू झाला. यामध्ये मरिन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५ किमी मार्गावर प्रवास करता येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा फायदा होत आहे. या प्रकल्पाचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही पालिका प्रशासनाने दिली.

..
दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालकांचा गोंधळ
कोस्टल रोडवरून वरळी नाका आणि हाजीअली येथे जाण्यासाठी लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालकांचा मंगळवारी (ता. ११) गोंधळ उडाला. फलकांवर बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक अशी नावे देण्यात आली होती. मात्र, बहुतांशी वाहनचालकांचा नेमका वरळीकडे जाणारा मार्ग कोणता आणि हाजीअली येथे जाणारा मार्ग कोणता, असा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे वाहनचालकांकडून तक्रारी करण्यात आल्या. अखेर कोस्टल रोड प्रशासनाने दोन्ही दिशादर्शक फलकांजवळ हाजीअली, ताडदेवकडे जाणारा मार्ग आणि वरळीकडे जाणारा मार्ग अशा नामोल्लेखाच्या पाट्या लावल्या आणि त्यानंतर वाहनचालकांमधील गोंधळ थांबला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com