शपथविधीत राज ठाकरेंना डावलले

शपथविधीत राज ठाकरेंना डावलले

शपथविधीत राज ठाकरेंना डावलले
महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेचण्याचा भाजपचा प्रयत्न; राजकीय तज्ज्ञांचा सूर

बापू सुळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपप्रणित ‘एनडीए’ला बिनशर्त पाठिंबा दिला; मात्र तरीही मोदी सरकारच्या शपथविधीला बोलवण्यात आले नव्हते. यामुळे ‘मनसे’मध्ये अस्वस्थता आहे; मात्र ही दिसते तशी सरळ गोष्ट नसून, महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा सूर राजकीय तज्ज्ञांनी उमटवला आहे.

राज ठाकरे यांना शपथविधीला न बोलावणे, अजित पवारांच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान ने देणे, सात जागा जिंकलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची केवळ एका राज्यमंत्रिपदावर बोळवण करणे या गोष्टी ठरवून केल्याचा निष्कर्ष राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत मोठ्या सभा घेतल्या होत्या. शिवाजी पार्कच्या सभेचे आयोजनही मनसेने केले होते. प्रत्यक्षात त्याचा किती फायदा झाला हे अजून स्पष्ट नाही; मात्र राज ठाकरेंच्या प्रचारामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, कोकण अशा भागात महायुतीला फायदा झाल्याचे सांगितले जाते. परभणी मतदारसंघातून पराभूत झालेल्या महादेव जानकर यांना शपथविधीसाठी बोलावले जाते; मात्र राज ठाकरेंना डावलले जाते, त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली असल्याचे कळते.

..
शपथविधी सोहळ्याला कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार भाजपचा होता. त्यामुळे जे महत्त्वाचे वाटत होते त्यांनाच निमंत्रण दिले, जे महत्त्वाचे वाटत नव्हते त्यांचा सोयीस्कर विसर पडल्याचे दिसत आहे.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक
....
राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत मोठी जोखीम घेतली होती; मात्र भाजपने त्यांना शपथविधीला बोलावण्याचे सौजन्यही दाखवले नाही. यावरून भाजप सोयीचे राजकारण करते हे स्पष्ट होते. याचा विचार मनसेपासून भाजपसोबत असलेल्या पक्षांनी केला पाहिजे.
- संजय पाटील, राजकीय विश्लेषक
..
नुसते राज ठाकरे यांनाच शपथविधीला बोलावले नाही असे नाही, तर भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीची बोळवण केल्याचे दिसत आहे. ज्याचा जेवढा फायदा, तेवढेच त्याला महत्त्व हे भाजपचे धोरण दिसते.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

भाजपने मनसेचा पाठिंबा घेतला असला, तरी ते त्यांच्या ताकदीचे मोजमाप करूनच त्यांच्याशी वागताना दिसत आहे. यावरून भविष्यातील भाजपची मित्रपक्षांसोबत चाल कशी असेल ते दिसते.
- जयंत माईनकर, ज्येष्ठ पत्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com