गर्भवतीची डोलीतून रुग्णवाहीकेपर्यंत फरफट

गर्भवतीची डोलीतून रुग्णवाहीकेपर्यंत फरफट

मुरबाड, ता. १(बातमीदार): तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत अजून रस्ते पोहोचलेले नाहीत. त्यामुळे प्रसूती वेदनांनी कळवळणाऱ्या महिलांना आजही रुग्णालय किंवा रुग्णवाहिका गाठण्यासाठी डोलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील ओजीवले पाड्यात अशीच एक घटना घडली आहे. आशासेविकेच्या सतर्कतेमुळे येथील गर्भवतीची घरगुती प्रसूती टळून आरोग्य केंद्रात तिची सुखरूप प्रसूती झाली, मात्र पाड्यापर्यंत रस्ता पोहोचला नसल्याने रुग्णवाहिकेपर्यंतचे अंतर गाठण्यासाठी डोलीचाच आधार घ्यावा लागल्याचे उघडकीस आले आहे.

वांगणी डोणे येथील चित्रा पवार ही गर्भवती महिला २२ जून रोजी मुरबाड तालुक्यातील ओजीवले येथे माहेरी आली होती. २३ तारखेला मध्यरात्री तिच्या पोटात दुखु लागले. तिला असहाय्य वेदना होत असल्याने तेथील महिला तिची घरगुती प्रसूती करण्याचा प्रयत्न करीत होत्या. ही माहिती आशा सेविका नंदा पवार यांना मिळताच त्यांनी धावपळ करत रुग्णवाहिका ओजीवले वाडीत बोलवली, परंतु वाडीपासून मुख्य रस्ता लांब आहे. वाडीपर्यंत जाण्यास रस्ता नसल्याने रुग्णवाहिका तेथेच उभी राहिली. गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला मदतीने घरापासून रुग्णवाहिकेपर्यंत डोलीने नेण्यात आले.

धसई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळीच तिला दाखल केल्याने तिची नैसर्गिक प्रसूती झाली आहे. आशासेविका नंदा पवार यांच्या प्रसंगावधानामुळे येथील एका आदिवासी महिलेला आणि तिच्या बाळाला जीवदान मिळाले आहे, पण यानिमित्ताने या पाड्यासह मुरबाडमधील असंख्य गावापाड्यांपर्यंत अजूनही रस्ता न पोहोचल्याने आजही रुग्णांची व गर्भवतींची कशी फरपट सुरू आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

रस्त्यासाठी निवेदन
ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुरबाड विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व भाजप आमदार किसन कथोरे करतात. माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे १० वर्षे या क्षेत्राचे लोकप्रतिनिधित्व करत होते. असे असतानाही येथील शेकडो कातकरी, आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेच नाहीत. त्यातूनच वेळीच रुग्णालय गाठता न आल्याने साप, विंचू दंशाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गर्भवतींसाठी अनेक योजना आहेत, पण सुखरुप बाळंतपणासाठी त्यांना रुग्णालय गाठणेही कठीण होत आहे. त्यामुळे आजही या पाड्यांमध्ये घरगुती प्रसूती होत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर कातकरी वाडीत रस्ता तयार करावा, अशी मागणी माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांना पत्र पाठवून केली आहे

घरगुती प्रसूतीमुळे महिलांचे जीव धोक्यात येतात. महिलेला संसर्ग होऊन अनेक आजाराशी सामना करावा लागतो, परिणामी जीव गमवावा लागतो. हॉस्पिटलमध्ये अनेक गंभीर रुग्णांचा स्ट्रेचरवरच उपचार केला जातो. स्ट्रेचरवर माणूस दगावतो, असा आदिवासींमध्ये गैरसमज असल्याने त्यांची जनजागृती होणे गरजेचे आहे.
-डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी, मुरबाड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com