वसईत पर्यटकांना नो एंट्री

वसईत पर्यटकांना नो एंट्री

वसई, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात अनेक पावसाळी पर्यटनस्थळे आहेत. वसई तालुक्यातील पर्यटनस्थळांना मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील अनेक पर्यटक भेटी देत असतात; मात्र पर्यटकांच्या उन्मादामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. त्यातही जुलै महिन्यात भरतीचा इशारा देण्यात आला आहे, यावेळी लाटांची उंची साडेपाच मीटरपेक्षा अधिक असेल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून पर्यटनस्थळावर ८ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

पावसाळा सुरू झाला की, अनेकजण सहलीचा बेत आखतात. आजूबाजूच्या पर्यटनस्थळांचा शोध घेतला जातो. त्यामुळे मुंबईकरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईतील तुंगारेश्वर, चिंचोटी धबधब्याकडे पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असतात; मात्र यादरम्यान पाण्याचा, दरीचा अंदाज न आल्याने आनंदाच्या भरात अनेक पर्यटक मृत्यूला कवटाळतात. जुलै २०१७ मध्ये आठ युवकांचा बळी गेला होता तर २०१८ मध्ये चिंचोटी धबधब्यात १०६ पर्यटक अडकले होते. त्यांना जरी सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी त्यावेळी मोठी दुर्घटना होण्याची भीती होती.

पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अनेकजण मद्यपान करूनदेखील धबधब्यात, समुद्रकिनारी जात असतात. यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज येत नाही व दुर्घटना घडते. समुद्रातदेखील भरतीच्या वेळी अशा घटना घडतात. त्यामुळे पर्यटनबंदी घालण्यात आली आहे.

वसईत ज्या ठिकाणी पर्यटकांना बंदी आहे, अशा ठिकाणची यादी जाहीर करण्यात आली आहे. जो कुणी या आदेशाचा भंग करेल, त्याच्यावर भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ प्रमाणे शिक्षा करण्यात येईल, असा इशारा पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी दिला आहे.

वसईत या ठिकाणी बंदी
रुची बीच, रानगाव बीच, ब्रह्मपाडा बीच व भुईगाव बीच
चिंचोटी थबथबा व देवकुंडी कामण
राजिवली खदान

काय काळजी घ्याल?
धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसू नये.
धोकादायक ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, वळणावर सेल्फी, चित्रीकरण करू नये.
धोकादायक ठिकाणी वाहने थांबवू नयेत.

...तर होणार कारवाई
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे.
सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, वाहनातील स्पीकर वाजवण्यास बंदी.
पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यावर प्रतिबंध.
खोल पाण्यात उतरणे अथवा पोहणे.
धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगण्यास मनाई.
..........................................
तुंगारेश्वर अभयारण्यात वर्षासहलीस प्रतिबंध
विरार, ता. २ (बातमीदार) : वर्षा सहलीसाठी अनेकजण तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात जातात; परंतु हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना ३० सप्टेंबपर्यंत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य अधिकारी संदीप चौरे यांनी दिली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला तुंगारेश्वर अभयारण्य हा परिसर मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, तसेच वसई- विरार शहरालगत आहे. त्यामुळे सुटीच्या दिवसांत तुंगारेश्वर अभयारण्यातील वर्षा ऋतूमध्ये आल्हाददायक वातावरण असते. त्यामुळे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महादेव मंदिर परिसरातील चिंचोटीसारख्या धबधब्यातील कुंडांच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दरवर्षी या ठिकाणी अपघात होतात. यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तसेच यावर्षीही या अपघाताचा धोका लक्षात घेता वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वर्षा सहलीसाठी पर्यटकांना प्रतिबंध घातला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com