भिवंडी-वाडा महामार्गावर खड्डेच खड्डे

भिवंडी-वाडा महामार्गावर खड्डेच खड्डे

Published on

भिवंडी-वाडा महामार्गावर खड्डेच खड्डे
वाहतूक कोंडी; अपघातांची भीती, वाहनचालकांची कसरत
वाडा, ता. २ (बातमीदार) : भिवंडी-वाडा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्यात हा रस्ता खड्डेमय होतो. उन्हाळ्यात पुन्हा रस्त्याची मलमपट्टी केली जाते; मात्र त्यानंतर पुढील वर्षी पावसाळ्यात तीच अवस्था असते. मागील दहा ते बारा वर्षे अशीच परिस्थिती आहे. परिणामी भिवंडी-वाडा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त कधी होणार अन् नागरिकांचा प्रवास सुखकर कधी होणार, असा सवाल केला जात आहे.

भिवंडी-वाडा-मनोर हा महामार्ग दहा-बारा वर्षांपूर्वी तयार केला होता. सरकारने या रस्त्याचे काम ''बांधा, वापरा व हस्तांतरित करा'' या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला दिले होते. हा रस्ता ६४ किमी अंतराचा आहे. वाडा ते मनोर या रस्त्याचे काम दर्जेदार झाल्याने हा रस्ता काही वर्षे चांगला होता; मात्र आता तो नादुरुस्त झाला आहे. भिवंडी ते वाडा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यात वाहने आदळत असल्याने वाहनांचे त्यामुळे नुकसान होत आहे; तर वनविभागाच्या अखत्यारीत असलेला सुमारे १६ किमी अंतराचा रस्ता अद्यापही दुपदरीच आहे; तर पिंजाळ व देहर्जे या नद्यावरील पुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. तसेच भिवंडी ते वाडा या दरम्यानचा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे; तर अनेक जण जखमी झाले आहेत.

वाडा-भिंवडी-मनोर दरम्यानचा रस्ता उखडला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी भिंवडी तालुक्यातील वारेट येथे खड्डा चुकवताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.त्यानंतर तालुक्यातील कुडूस येथील डाॅ. नेहा शेख या तरुणीचे ९ नोव्हेंबर २०१९ रोजी लग्न ठरलेले होते. लग्नाचे सामान खरेदी करण्यासाठी ती नातेवाईकांसह ठाण्यात गेली होती. खरेदी करून कुडूस येथे परतत असताना भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथे दुचाकीवरून तिचा भाऊ व ती येत होती. दुगाडफाटा येथे खड्डा चुकवत असताना ती गाडीवरून पडून समोरून येत असलेल्या ट्रकखाली आल्याने जागीच तिचा मृत्यू झाला.

श्रमजीवी, जिजाऊ संस्थेचे आंदोलन
वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे श्रमजीवी संघटना, जिजाऊ संस्था व नागरिकांनी संतप्त होत अंबाडी कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. याची दखल घेत शासनाने हा रस्ता सुप्रीम कंपनीकडून काढून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. तेही पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्याची मलमपट्टी करतात. पुन्हा तीच अवस्था असते.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
यंदाच्या पावसाळ्यातही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची मलमपट्टी केली जाते; मात्र कायमस्वरूपी डागडुजी केली जात नाही. त्यामुळे खड्ड्यातून नागरिकांची अद्यापि मुक्तता होऊ शकलेली नाही. हा रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तू गीते यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सिमेंट काॅंक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन
लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत कुडूस येथे रस्त्याच्या सिमेंट काॅंक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन केले; मात्र अद्याप या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. सिमेंट काॅंक्रीटचा रस्ता कधी होईल ते माहीत नाही; मात्र आता रस्त्यावरील खड्डे बुजवा, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करीत आहेत.

करोडो रुपयांचा खर्च
भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील सात-आठ वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला; मात्र रस्त्याच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भरच पडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.