जिल्‍हा परिषदेकडून जलशुद्धीकरणावर भर

जिल्‍हा परिषदेकडून जलशुद्धीकरणावर भर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : शुद्ध, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे. जलजन्य आजार रोखण्याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.
अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यांसारखे अनेक आजार होतात, त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
अभियान एकूण आठ आठवडे चालणार असून प्रत्येक आठवड्यात गाव पातळीवर वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत. पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे. व शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. विशेष करून प्रत्येक सेप्टिक टॅंक असलेल्या शौचालयांना शोषखड्डा तयार करणे, घरातील सांडपाणी परसबाग किंवा शोषखड्डा करून त्यात सोडणे, हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.

अभियानात काय करणार?
अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील शाळा, अंगणवाड्या प्राथमिक आरोग्यकेंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
अंगणवाड्यांमध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेतील पाणीगळती शोधून त्याची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे तसेच गावामध्ये ग्रे वॉटर मॅनेजमेंट बाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

छतावरील पावसाचे पाणी संकलन करून साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना सुरक्षित पाणी वापराच्या महत्त्व याबाबत रॅली, पोस्टर ,पथनाट्ये तसेच घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. पाणी गुणवत्ता विषयक माहितीबाबत जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन करून घराघरांत पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होईल, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाने या अभियानात सहभाग घेऊन अभियान राबविण्यात येणार आहे
- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


अलिबाग ः अभियानाबद्दल मुख्य कार्यकारी अभिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com