मुंबईतील काँक्रिट रस्‍त्‍यांची चाचणी

मुंबईतील काँक्रिट रस्‍त्‍यांची चाचणी
Published on

मुंबईतील काँक्रीट रस्‍त्‍यांची चाचणी
आयआयटीत नमुने तपासणार; दोन ठिकाणी ‘कोअर टेस्ट’ पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई महानगरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईकरांना चांगल्या प्रकारचे विशेषतः खड्डेमुक्त रस्ते अनुभवता यावेत, यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्यात येत आहेत. या कामांमध्ये अधिक गुणवत्ता आणण्यासाठी प्रत्येक रस्त्याच्या कामाची ‘कोअर टेस्ट’ केली जाणार आहे. या अंतर्गत मुंबई उपनगरात दोन ठिकाणी सोमवारी (ता. १) या चाचणीला सुरुवात झाली आहे.
मुंबईत सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झालेल्या, आगामी काळात होऊ घातलेल्या प्रत्येक सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांची सामर्थ्य चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही चाचणी केली जात आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्वेतील मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्लेतील दीक्षित मार्ग येथे रस्ते विभागाकडून ही चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर हे स्वतः उपस्थित होते. चाचणी करताना संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा वर्तुळाकार पद्धतीने भाग कापण्यात आला. हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हे नमुने पुढील सामर्थ्य तपासणीसाठी आयआयटी, मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

३२४ किलोमीटरचे रस्ते
मुंबई महानगरात पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण ३२४ किलोमीटरच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी २९.३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नियोजित कामाची निविदा प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर आहे. ही कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी ‘आयआयटी’ मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांनी महापालिकेच्या अभियंत्यांना विचारमंथन कार्यशाळेतून मार्गदर्शनही केले होते.

प्रयोगशाळेत नमुने तपासणी
पश्चिम उपनगरांमध्ये झालेल्या ‘कोअर टेस्ट’मध्ये संकलित केलेले सिमेंट काँक्रीटचे नमुने हे पुढील सामर्थ्य चाचणीसाठी ‘आयआयटी मुंबई’च्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांची सामर्थ्य तपासणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. ‘आयआयटी’मार्फत या नमुन्यांचे परीक्षण व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेमार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

सामर्थ्य चाचणी म्हणजे काय?
१. सामर्थ्य चाचणी संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा भाग वर्तुळाकार पद्धतीने कापण्यात येतो.
२. पुढील तपासणीसाठी कापलेला नमुना आयआयटी, मुंबई प्रयोगशाळेत पाठवतात.
४. काँक्रीटच्या भागाची सामर्थ्य चाचणी केली जाते.
४. यातील साधनसामुग्रीचे गुणोत्तर, टिकाऊपणा, एकजिनसीपणा, भारवहन या अनुषंगाने विविध परिमाणांच्या निकषांवर सामर्थ्य चाचणी केली जाते.
गुणवत्ता हमी आणि गुणवत्ता नियंत्रण या माध्यमातून सिमेंट काँक्रीटचे रस्ते फक्त अस्तित्वात येणार नाहीत, तर रस्त्यांचा दर्जा सर्वोत्कृष्ट राहील. या गुणवत्ता उद्दिष्टाच्या माध्यमातून कंत्राटदारांवरदेखील अधिकाधिक दर्जेदार कामे करण्याचे बंधन असणार आहे.
अभिजीत बांगर,
अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.